बारबुडा – अभिनेता व निर्माता सुनील शेट्टी आणि चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप यांना फरार व्यावसायिक मेहुल चोक्शीने कायदेशीर नोटीस पाठवली आहे. ‘फाईल क्रमांक ३२३’ या चित्रपटात आपली प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला आहे, असा आरोप त्याने केला आहे. चोक्शीचे वकील आयुष जिंदाल यांनी १९ नोव्हेंबरला ही नोटीस बजावली आहे. नीरव मोदी आणि विजय मल्ल्या अशा आर्थिक घोटाळ्यातील फरारींवर हा चित्रपट तयार केला जात आहे.
मेहुल चोक्शीवर आर्थिक गैरव्यवहारात गुंतल्याचा आरोप आहे. मात्र त्यांच्या विरोधात कोर्टात कोणताही आरोप सिद्ध झालेला नाही. असे असताना त्यांची आधीच खूप बदनामी झाली आहे. त्यानंतर आता फाईल नंबर ३२३ मध्ये पुन्हा बदनामी केली जात आहे. ती थांबवण्यात यावी, अशा मागणीची कायदेशीर नोटीस चोक्शीने सुनील शेट्टी आणि अनुराग कश्यपला पाठवली आहे. दरम्यान, मेहुल चोक्शीने अशी काही नोटीस पाठवणे हेच हास्यास्पद आहे. जे सर्वांसमोर खुले आहे. त्यावर आम्ही चित्रपट बनवत आहोत, असे सुनील शेट्टी यांनी सांगितले. १४ हजार कोटींच्या पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील मेहुल चोक्शी फरार आरोपी आहे. तो नीरव मोदीचा मामा आहे. सध्या तो बारबुडात असल्याचे समजते.