नवी दिल्ली – कांदा लसूण न खाणाऱ्या तसेच पूर्ण शाकाहारी भोजन घेणाऱ्या प्रवाशांना रेल्वे प्रवासात आता सात्विक थाळीचा आस्वाद घेता येणार आहे. या प्रवाशांच्या अडचणी लक्षात घेऊन आरसीटीसीने इस्कॉन मंदिराच्या गोविंदा रेस्टॉरंटबरोबर सहकार्य करार केला आहे. पहिल्या टप्प्यात दिल्लीच्या हजरत निजामुद्दीन स्टेशनपासून ही सेवा प्रवाशांना उपलब्ध करून दिली जात असून त्यानंतर टप्प्याटप्प्याने देशभर सुरू केली जाणार आहे.
रेल्वेचा प्रवास अधिक अंतराचा असेल तर शुध्द शाकाहारी प्रवाशांना भोजनाची अडचण येते. त्यातही कांदा लसूण न खाणाऱ्या प्रवाशांना रेल्वे पँट्री किंवा अन्य ई केटरिंग सेवा यातून उपलब्ध होणाऱ्या पदार्थांच्या शुद्धतेबद्दल खात्री वाटत नाही. आरसीटीसीने देशातील विविध भागात किफायती दरात टूर पॅकेज देणारी ‘देखो अपना देश’ योजना सुरू केली आहे. या माध्यमातून देशातील विविध धार्मिक स्थळांची यात्रा करता येते. या प्रवासात सात्विक थाळी प्रवाशांची मोठीच सुविधा ठरेल, असे रेल्वे अधिकारी सांगतात. या सेवेमध्ये डिलक्स, महाराजा थाळी, पुरानी दिल्ली व्हेज बिर्याणी, नुडल्स, दाल मखनी, पनीर यासह अन्य अनेक पर्याय आहेत. थाळीसाठी प्रवाशांना प्रवास सुरू होण्याच्या दोन तास आधी ऑर्डर द्यावी लागेल. प्रवाशांना पीएनआर नंबरसह बसल्या जागीच थाळी मिळणार आहे, असे रेल्वेने जाहीर केले आहे.