मुंबई – बी. आर. चोपडा यांच्या प्रसिद्ध महाभारत मालिकेत भीमाची भूमिका साकारणारे आणि आशियाई व कॉमनवेल्थ क्रीडा स्पर्धेत पदके पटकवून देशाचे नाव उंचवणारे अभिनेते व खेळाडू प्रवीण कुमार यांचे निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून आजारी असलेल्या प्रवीण कुमारांची आर्थिक परिस्थितीही खालावली होती. त्यामुळे शारीरिक आणि आर्थिक संकटांचा ते सामना करत होते.
बलदंड शरीरयष्टीमुळे प्रवीण कुमार यांची महाभारत मालिकेतील भीमाच्या भूमिकेसाठी निवड झाली होती. ती त्यांनी सार्थ ठरवली. या भूमिकेमुळे ते घराघरात पोहोचले. त्यांना अमाप प्रसिद्धी मिळाली. काही चित्रपटांमध्येही त्यांनी भूमिका केल्या. आशियाई आणि कॉमनवेल्थ क्रीडा स्पर्धांमध्ये त्यांनी पदके पटकावली होती. त्यामुळे अर्जुन पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते. खेळातील कामगिरीमुळे त्यांना सीमा सुरक्षा दलात नोकरी मिळाली होती. त्यानंतर त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यातही त्यांनी आपला ठसा उमटवला. मात्र गेल्या काही दिवसांपासून पाठीच्या दुखण्याने ते हैराण झाले होते. उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले.