सांगली – मिरजेतील सुभाष नगर बारगाले प्लॉट याठिकाणी प्रेम विवाह केल्याच्या रागातून २८ वर्षीय योगेश चंद्रकांत लवाटे या तरुणावर अज्ञात हल्लेखोरांनी सैराट चित्रपटासारखा प्राणघातक हल्ला करून गंभीर जखमी केले आहे. जखमी योगेश याच्यावर मिरजेतील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. योगेश याने दीड महिन्यांपूर्वी वाळवा तालुक्यातील भडकंबे आष्टा येथील तरुणीशी प्रेमविवाह केला होता.
या दोघांच्या प्रेमविवाहाला मुलीच्या कुटुंबियांचा तीव्र विरोध होता. त्यामुळे त्यांनी सूड घेण्याचे ठरवले होते. दोन दिवसांपूर्वी दोन्हीकडील नातेवाईकांचा वाद झाला होता. हा वाद पोलिसांत पोहचला. मात्र, पोलीस स्टेशनमध्येच मुलींच्या वडिलांनी योगेश याला धमकी दिली होती. गुरुवारी रात्री साडे आठ वाजता मोटारसायकलवरून आलेल्या दोघा हल्लेखोरांनी त्याच्यावर धारधार शस्त्राने हल्ला करून पळ काढला. यावेळी गंभीर जखमी योगेशला त्याच्या मित्रांनी खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. याबाबत योगेशच्या काकू वैशाली लवाटे यांनी अज्ञात हल्लेखोरांच्या विरोधात तक्रार दिली आहे. शहर पोलिसांनी दोघा हल्लेखोरांना ताब्यात घेतले असून मिरज पोलीस पुढील तपास सुरू आहे.