नाशिक – प्रेयसी आणि तिच्या कुटुंबियांकडून पेट्रोल टाकून पेटवून दिलेल्या ३१ वर्षीय युवकाचा व्हॅलेंटाइन डे च्या दिवशी उपचारादरम्यान मृत्यू झाला. यानंतर देवळा तालुक्यातील लोहोणेर गावात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. अनुचित प्रकार टाळण्यासाठी देवळा पोलिसांची अतिरिक्त कुमक या गावात तैनात करण्यात आली आहे.
देवळा तालुक्यातील लोहोणेर येथे प्रेम प्रकरणाच्या वादातून रावळगाव येथील मुलीने आपल्या कुटूंबियांच्या मदतीने मुलाच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिलेल्या युवका या घटनेत युवक ८५ टक्के भाजला होता. अखेर या युवकाचा आज उपचार सुरु असताना मृत्यू झाला. या युवकावर आज लोहोणेर येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. यापार्श्वभूमीवर या घटनेतील आरोपींना कडक शिक्षा व्हावी अशी मागणी करत येथील ग्रामस्थांनी गाव बंद ठेवले आहे. व्हेलेंटाईन डे अर्थात प्रेमाचा दिवस या दिवशी अशी घटना घडल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला जात आहे.
लोहोणेर येथील युवक गोरख बच्छाव हा काही वर्षापूर्वी रावळगाव ता.मालेगाव येथील युवतीच्या संपर्कात आल्याने दोघांमध्ये प्रेम संबध निर्माण झाले. मात्र, युवतीच्या घरच्यांनी तीचे दुसरीकडे लग्न निश्चित केले होते. दरम्यान, या युवतीचा विवाह मोडला होता. यानंतर हा विवाह गोरख यानेच मोडल्याचा संशय युवतीच्या घरच्यांना होता. यानंतर शुक्रवारी युवतीसह तिचे कुटुंबीय लोहोणेर येथे येवून या युवकाच्या डोक्यात लोखंडी सळईने वार करुन मुलीने त्याच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिले होते. या घटनेत गोरख बच्छाव हा सुमारे ८५ टक्के भाजला होता. त्यावर सुरुवातीला देवळा ग्रामिण रुग्णालयात प्राथमिक उपचार करुन पुढिल उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले होते.
मात्र, जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असताना या युवकाचे निधन झाले. देवळा पोलिसांनी मुलगी कल्याणी सोनवणे, वडिल गोकुळ सोनवणे, आई निर्मला सोनवणे, भाऊ हेमंत सोनवणे व प्रसाद सोनवणे यांना ताब्यात घेतले असून १५ फेब्रुवारीपर्यंत या पाचही संशयितांना पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास देवळा पोलीस करत आहेत.