*ट्विटरने कमी केलेल्या कर्मचाऱ्यांना परत बोलावले
नवी दिल्ली :ट्विटरचे नवे मालक एलोन मस्क यांनी ट्विटरची सूत्रे हाती घेताच अधिकाऱ्यांसह, कर्मचारीवर्गाला कामावरून काढून टाकण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार त्यांनी प्रत्येकाला ई- मेलही पाठवले होते. मात्र या कर्मचाऱ्यांची कपात केल्यानंतर ट्विटरला पुन्हा याच कर्मचाऱ्यांची गरज असल्याची माहिती समोर येत आहे.त्यानुसार आता कमी केलेल्या कर्मचाऱ्यांना ट्विटरकडून ‘प्लिज कम बॅक’अशी विनंती करत पुन्हा कामावर रुजू होण्यास सांगितले असल्याची माहिती एका इंग्रजी वृत्तसंस्थेने दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ट्विटरकडून प्रत्येक कर्मचाऱ्याला ‘घरी जा, परत ऑफिसला येऊ नका’, अशा संदेशाचे मेल करण्यात आले होते. मात्र घरचा रस्ता दाखवलेल्या अनेक कर्मचाऱ्यांशी पुन्हा संपर्क साधून त्यांना कामावर परत येण्यास सांगितले आहे. काही कर्मचाऱ्यांचा अनुभव आणि काम कंपनीच्या हितासाठी आवश्यक असल्याचे व्यवस्थापनाच्या लक्षात आल्यानंतर त्यांना परत कामावर रुजू होण्यास सांगण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे. ब्लूमबर्गच्या एका वृत्तानुसार, ट्विटरवर ताबा घेताच एलन मस्क यांनी सर्वात आधी भारतीय वंशाचे सीईओ पराग अग्रवाल यांच्यासह तीन उच्च अधिकाऱ्यांना काढून टाकले आणि नंतर शुक्रवारी सुमारे ३७०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले. एवढ्या मोठ्या प्रमाणात कपात केल्यानंतर आता त्यांना त्याची चूक कळत असून त्यांनी यू-टर्न घेतल्याचे बोलले जात आहे. बिझनेस स्टँडर्डच्या रिपोर्टनुसार, एलन मस्क यांनी ट्विटरवरून काढलेल्या काही कर्मचाऱ्यांना कामावर परतण्याचे आवाहन केले आहे. कंपनीने बडतर्फ कर्मचार्यांना ‘प्लिज कम बॅक’ अशी विनंती केली आहे. तथापि, मस्क यांनी किती कर्मचार्यांना कामावर परत येण्यास सांगितले आहे याचा खुलासा अहवालात करण्यात आलेला नाही. दरम्यान, कंपनीचे माजी संचालक जॅक डोर्सी यांनीदेखील ट्विटरवर अशा मोठ्या प्रमाणात कपातीबद्दल चिंता व्यक्त केली होती.