फलटण – कोरोनाच्या कालावधीत घटत्या प्रवासी संख्येअभावी थांबविलेली डेम्यू रेल्वे सेवा पूर्ववतपणे सुरू करण्यात आली आहे. या लोहमार्गावरून आता फलटण-लोणंद व फलटण-पुणे या डेम्यू रेल्वे गाड्या खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नांमुळे पुन्हा धावणार आहेत. या सेवेचा प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
दहा डबे असलेल्या या गाड्या सोमवार ते शनिवार नियमितपणे धावणार आहेत. रेल्वे गाडी क्रमांक ०१५३५ ही पुणे येथून सकाळी ५.५० वाजता सुटेल व सकाळी ९.३५ वाजता फलटण येथे पोहोचेल. तर परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक ०१५३६ फलटण येथून सायंकाळी ६ वाजता सुटेल व पुणे येथे रात्री ९.३५ वाजता पोहोचेल. ही गाडी सासवड, जेजुरी, नीरा, लोणंद व सुरवडी स्टेशनवर थांबेल. फलटण येथून नीरा ३०, जेजुरी ४०, सासवड ५५ व पुण्यासाठी ६० रुपये असा तिकीट दर असणार आहे. तर गाडी क्रमांक ०१५३८ फलटण येथून सकाळी ११ वाजता सुटेल व १२.२० वाजता लोणंदला पोहोचेल. परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक ०१५३७ लोणंद येथून दुपारी तीन वाजता सुटेल व फलटण येथे ४.२० वाजता पोहोचेल. ही गाडी सुरवडी स्टेशनवर थांबेल. यासाठी फलटणहून सुरवडी व लोणंदसाठी ३० रुपये तिकीट दर असेल. दरम्यान, रेल्वे प्रवाशांनी प्रवास कालावधीत मास्क व सॅनिटायझरचा वापर करावा आणि सामाजिक अंतर राखावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.