मुंबई- शाळा चालू करण्यासाठी फुले- आंबेडकरांनी भीक मागितली असल्याचे वक्तव्य राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले होते. त्यांच्या याच वक्तव्यावर अनेकांनी आक्षेप घेतला होता. त्याच्या या विधानानंतर त्यांच्या विरोधात अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात आली होती. त्यामुळे आज अखेर चंद्रकांत पाटील यांनी फुले-आंबेडकरांबाबत केलेल्या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे.माझ्या विधानामुळे कोणाचे मन दुखावले गेले असल्यास मी दिलगिरी व्यक्त करत असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले.
पाटील यांनी म्हटले आहे की, माझ्या विधानाचा विपर्यास करण्यातआला. त्यामुळे या भीक शब्दाने जर कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करायला तयार आहे. मी एवढ्या छोट्या मनाचा माणूस नाही. माझ्या रक्ता-रक्तात आंबेडकर, महात्मा फुले हे आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी, महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा सुरू केल्या. ते सरकारी अनुदानावर अवलंबून राहिले नाही. त्यांनी लोकांकडून पैसे मागितले. आपण वर्गणी मागितली, सीएसआर मागितला असे आज म्हणतो. त्या काळात कर्मवीर भाऊराव पाटील घरोघरी फिरून धान्यही मागायचे, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
दरम्यान पाटील यांच्या विधानावर राष्ट्रवादीसह शिवसेनेच्या नेत्यांनी जोरदार टीका केली होती.काँग्रेसने चंद्रकांत पाटील यांच्या विधानाच्या निषेधार्थ पुण्यात जोरदार बॅनरबाजी केली.चंद्रकांत पाटील यांचा एडिट केलेला फोटो बॅनरवर वापरून ‘भिकेमध्ये मिळालेला कोथरूड मतदारसंघ’असा मजकूर लिहून हे बॅनर लावण्यात आले आहेत.राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. खासदार राऊत यांनी या विधानावर टीका केली. ज्या पक्षाचे नेते छत्रपती शिवाजी महाराजांचाआदर करत नाहीत, त्याच पक्षाचे हे वंश असल्याचे राऊत म्हणाले. तुमच्या तिजोरीत जे पैसे येतात ती सुद्धा भीक आहे असे म्हटले पाहिजे.