हैदराबाद – देशातील टॉप फॅशन डिझायनर्सपैकी एक असलेल्या प्रत्युषा गारिमेला हिचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. शनिवारी ती तेलंगणातील बंजारा हिल्स अपार्टमेंटमध्ये मृतावस्थेत आढळली. पोलिसांनी तिचा मृतदेह ताब्यात घेतला असून तिच्या बेडरूममधून विषारी वायू कार्बन मोनॉक्साईडची बाटली जप्त केली आहे. याप्रकरणी संशयास्पद मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ३५ वर्षीय फॅशन डिझायनर प्रत्युषा ही बंजारा हिल्समध्ये राहत होती. तिच्याशी संपर्क होत नसल्याने शनिवारी, ११ जून रोजी दुपारी तिच्या सुरक्षा रक्षकांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी दरवाजा तोडून तिच्या घरात प्रवेश केला. तेव्हा घराच्या बाथरूममध्ये प्रत्युषाचा मृतदेह आढळला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन उस्मानिया रुग्णालयात पाठवला, तिथे शवविच्छेदन करण्यात आले. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच प्रत्युषाच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे. दरम्यान, तिच्या बेडरूममध्ये सापडलेल्या कार्बन मोनॉक्साईडच्या बाटलीवरून हे प्रकरण आत्महत्येचे असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. तसेच प्रत्युषा गेल्या काही काळापासून डिप्रेशनमध्ये होती. तिच्यावर उपचारही सुरू असल्याचेही बोलले जात आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही ठोस माहिती मिळालेली नाही.
प्रत्युषाचा फॅशन ब्रँड तिच्या नावानेच प्रसिद्ध आहे. ‘प्रत्युषा गारिमेला’ या नावाने ती कपड्यांचा ब्रँड चालवत होती. तिचे फ्लॅगशिप स्टोअर हैदराबाद, मुंबई येथे आहेत. याशिवाय इन्स्टाग्रामच्या माध्यमातूनही ती तिच्या डिझाइन्सचे प्रमोशन करायची. अनेक प्रसिद्ध बॉलिवूड आणि दाक्षिणात्य अभिनेत्री प्रत्युषाने डिझाईन केलेले कपडे परिधान करण्यास पसंती देत होत्या. अशातच तिच्या अचानक मृत्यूने फॅशन इंडस्ट्रीतील अनेकांना धक्का बसला आहे.