कोल्हापूर : डिसेंबर आणि जानेवारीमध्ये संपूर्ण राज्याला हुडहुडी भरलेली असताना, आता फेब्रुवारी महिन्याचे पंधरा दिवसही गेले नाही तोपर्यंत कोल्हापूरकरांना उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत. रविवारी कोल्हापूर जिल्ह्याचा तापमानाचा पारा ३५ अंशापर्यंत जाऊन पोहोचला असल्याची नोंद करण्यात आली आहे.
कोल्हापूरच्या सरासरी तापमानात तीन अंशांनी वाढ झाल्याने रविवारी जिल्ह्यातील तापमानाचा पारा ३५ अंशापर्यंत जाऊन धडकला. त्यामुळे येथे उन्हाच्या झळा चांगल्याच जाणवायला सुरुवात झाली आहे. तर पुढील सहा ते सात दिवस कोल्हापूर जिल्ह्यातील पारा ३४ ते ३५ अंशांदरम्यान राहील, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यात तुलनेत उन्हाचे चटके जाणवत नाहीत. मात्र, थंडीचा महिना असूनही थंडी न जाणवता फेब्रुवारी महिन्याच्या मध्यापूर्वीच उन्हाचा तडाखा वाढत चालला आहे. गेल्या काही दिवसांपासून पारा ३३ अंशांपुढे जात आहे. रविवारनंतर सोमवारी देखील हवेत उष्मा जाणवला. तर दुसरीकडे, रात्रीच्या किमान तापमानातही पुढील सहा दिवसांत १७ अंशांपर्यंत खाली जाईल, असाही हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे दिवसभर उष्ण हवमान आणि संध्याकाळी पारा घसणार अशी परिस्थिती असल्याचे आत हवनमान विभागाकडून निरीक्षण करण्यात आले आहे.