नवी दिल्ली – ५ दिवसांचा आठवडा करा, जुनी पेन्शन लागू करा या प्रमुख मागण्यांसह अन्य मागण्यांसाठी बँक कर्मचाऱ्यांनी सोमवारी २७ जूनला जाहीर केलेला देशव्यापी संप तूर्त स्थगित केला आहे. यामुळे सोमवारी बँका सुरू राहणार असल्याने नागरिक व खातेदारांची होणारी गैरसोय टळली आहे. मात्र २५ आणि २६ जूनला बँकांना सुट्टी आहे.
५ दिवसांचा आठवडा करा, सर्व पेन्शनधारकांसाठी नवी सुधारित पेन्शन योजना लागू करा, राष्ट्रीय पेन्शन योजना रद्द करा या मागण्यांसाठी ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कॉन्फडरेशन, ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन, आणि नॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ बँक वर्कर्स या प्रमुख बँक कर्मचारी आणि अधिकारी संघटनांसह ९ कर्मचारी संघटनांच्या संयुक्त मंच युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनने २७ जूनला संपाची हाक दिली होती. २५ जूनला चौथा शनिवार आणि २६ तारखेला रविवार असल्याने त्यामुळे सलग ३ दिवस बँकांचे कामकाज बंद रहाणार होते. परंतु बँक संघटनांनी हा संप सध्या स्थगित केला आहे. त्यामुळे सोमवारी बँकांचे कामकाज सुरू राहणार आहे.
