मुंबई : देशातील डिजिटल क्षेत्रातील टॉप १० महिलांची यादी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. या यादीत मुंबईतील बजाज ग्रुपच्या सुरुची महतपुरकर कोरे यांचा समावेश करण्यात आला आहे. या सगळ्या महिलांची माहिती वुमन एंटरप्रेन्योर इंडिया या देशातील प्रसिद्ध इंग्रजी मासिकाच्या नुकत्याच छापून आलेल्या आवृत्तीत प्रकाशित करण्यात आली आहे.
बजाज समूह हा भारतातील औद्योगिक कंपन्यांमध्ये अग्रगण्य असलेला ग्रुप आहे. बजाजच्या मुंबईतील मुख्यालयात डिजिटल आणि सोशल मीडिया स्ट्रॅटिजीचे काम करणाऱ्या सुरुची महतपुरकर कोरे यांचा समावेश डिजिटल क्षेत्रात कार्यरत असलेल्या देशातील टॉप १० सर्वश्रेष्ठ महिलांच्या यादीत करण्यात आला आहे. या यादीत त्यांचे नाव आल्याने बजाज ग्रुपच्या शिरपेचात आणखी एक मनाचा तुरा रोवला गेला आहे. ही यादी वुमन एंटरप्रेन्युअर इंडिया या मॅगझिनच्या नव्या आवृत्तीमध्ये छापण्यात आली आहे. या यादीत चेन्नईतील २, पुणे आणि नोएडामधील एक-एक तसेच मुंबई आणि बंगलोर मधील तीन- तीन महिलांचा उल्लेख आहे.
सुरुची महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकॅडमीचे सदस्य आणि पश्चिम रेल्वेचे सेवानिवृत्त वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी गजानन महतपुरकर यांची कन्या आहे. त्यांची बजाज टॉकीज ही साप्ताहिक मालिका खूप लोकप्रिय झाली. त्यांच्या नेतृत्वाखाली बजाज ग्रुपची मीडिया टीम उत्तम काम करत आहे. हे लक्षात घेऊनच टॉप १० महिला लीडर्स च्या यादीत त्यांचा समावेश करण्यात आला आहे. सुरुची यांनी या यशाचे श्रेय बजाज ग्रुपच्या मॅनेजमेंटच्या प्रेरणेला आणि कुटुंबाकडून मिळालेल्या पाठिंब्याला दिले आहे.