ढाका- चटगावच्या सीताकुंड उपजिल्ह्यात शनिवारी रात्री मोठी दुर्घटना घडली. २ खासगी कंटेनर डेपोंना भीषण आग लागली. त्यात २० जण होरपळून ठार झाले. या दुर्घटनेत ४५० पेक्षा अधिक जखमी झाले आहेत. त्यांना चटगाव मेडिकल कॉलेजच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आज सकाळी १०.१५ वाजेपर्यंत या दुर्घटनेतील मृतांची संख्या २० झाली होती, अशी माहिती चटगावचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अल्लाउद्दीन तालुकदार यांनी दिली.
सीताकुंड उपजिल्ह्यातील कदमरासुल परिसरात बीएम कंटेनर हा खासगी कंटेनर डेपो आहे. तेथे शनिवारी रात्री आग लागली. नंतर ती शेजारच्या डेपोत पसरली. दोन्ही कंटेनर डेपोंना आग लागल्यामुळे तेथे मोठे स्फोट झाले. त्यामुळे परिसर हादरला. येथील अनेक घरे व इमारतींच्या काचा फुटल्या. काही घरांच्या खिडक्या, दरवाजे निखळून पडले. या भीषण आगीत २० जणांचा होरपळून मृत्यू झाला. ४५० पेक्षा अधिक जखमी झाले आहेत. त्यातील ३५० जणांना चटगाव मेडिकल कॉलेजच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. त्यातील अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे या अग्निकांडातील मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. कंटेनर डेपोला लागलेली आग विझवताना अग्निशमन दलाच्या ३ जवानांचाही मृत्यू झाला. १९ फायर इंजिनसह अग्निशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम करत आहेत, अशी माहिती चटगाव अग्निशमन दलाचे अधिकारी मोहम्मद फारुख हुसेन सिकदर यांनी दिली. बीएम कंटेनर हा आंतरराष्ट्रीय कंटेनर डेपो आहे. मे २०११ पासून तो कार्यरत आहे, असे त्यांनी सांगितले.