ढाका – भारतात सर्वात लोकप्रिय असलेल्या आयपीएलचा पंधरावा हंगाम सुरू असताना क्रिकेट चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बांगलादेशचा माजी क्रिकेटपटू मुशर्रफ हुसैन रुबेल याचे काल मंगळवारी कॅन्सरमुळे निधन झाले. वयाच्या अवघ्या ४०व्या वर्षीच त्याने जगाचा अखेरचा निरोप घेतल्याने क्रिकेट विश्वात हळहळ व्यक्त होत आहे.
मुशर्रफ हा गेल्या काही दिवसांपासून या दुर्धर आजाराचा सामना करत होता, मात्र त्याची या आजाराशी सुरू असलेली झुंज काल संपली. युनायटेड रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती त्याच्या कुटुंबीयांनी दिली. मार्च २०१९ मध्ये त्याला ब्रेन ट्यूमर असल्याचे समोर आले होते. गेल्या वर्षी पुन्हा त्याला ट्यूमरचा त्रास जाणवला होता, परंतु त्यावर त्वरित उपचार केल्यानंतर तो बरा झाला होता. मुशर्रफच्या क्रिकेट कारकिर्दीबद्दल बोलायचे झाल्यास, त्याने २००८ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे क्रिकेटद्वारे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. पुढे २०१६ पर्यंत त्याने बांगलादेशकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले. यादरम्यान त्याने ५ वनडे सामने खेळताना २६ धावा काढल्या होत्या. तसेच ४ विकेट्सही घेतल्या होत्या.