लखनऊ – माफिया मुख्तार अन्सारीचा बाहुबली आमदार मुलगा अब्बास अन्सारीला ईडीने अटक केली. प्रयागराज येथील कार्यालयात शुक्रवारी सलग ९ तास चौकशी केल्यानंतर रात्री ११ च्या सुमारास ईडीने अन्सारीला अटक केली. त्याच्या वाहन चालकालाही ताब्यात घेतले आहे, अशी माहिती ईडीच्या अधिकाऱ्यांनी दिली.
बांदा कारागृहात असलेला माफिया मुख्तार अन्सारीचा मुलगा अब्बास अन्सारी महूचा आमदार आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी आमदार अन्सारी आणि त्याच्या पत्नीच्या विरोधात लुकाऊट नोटीस जारी केली होती. मात्र अब्बासला सर्वोच्च न्यायालयातून दिलासा मिळाला होता. त्यानंतर त्याला चौकशीसाठी नोटीस बजावली होती. त्यानुसार अब्बास अन्सारी वकिलासोबत शुक्रवारी दुपारी सिव्हिल लाईन्स येथील ईडीच्या कार्यालयात दाखल झाला. तेथे दुपारी १ वाजल्यापासून रात्री ११ वाजेपर्यंत त्याची चौकशी सुरू होती. या चौकशीनंतर त्याच्यावर अटकेची कारवाई केली. या प्रकरणात त्याचा ड्रायव्हर रवी शर्मालाही ईडीने ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात त्याचा पार्टनर कलीमचीही चौकशी झाली.