पाटना -बिहारमधील बाहुबली आमदार आनंत कुमार सिंह यांना एके-४७ प्रकरणी पाटणाच्या न्यायालयाने आज १० वर्षांची शिक्षा सुनावली. या प्रकरणात १४ जूनला न्यायालयाने त्यांना दोषी ठरवले होते. त्यानंतर आज शिक्षेची सुनावणी झाली. यामुळे त्यांची आमदारकीही धोक्यात आली आहे. २ वर्षांपेक्षा जास्त शिक्षा झाल्यास लोकप्रतिनिधीचे सदस्यत्व रद्द होते. दरम्यान, या शिक्षेला ते उच्च न्यायालयात आव्हान देणार आहेत, अशी माहिती अनंत सिंह यांचे वकील सुनील कुमार यांनी दिली.
पाटना पोलिसांनी १६ ऑगस्ट २०१९ रोजी आमदार अनंत कुमार यांच्या घरावर छापा घातला होता. त्यावेळी त्यांच्या घरात एके-४७ रायफल, ३३ जिवंत काडतुसे व २ हातबॉम्ब सापडले होते. या प्रकरणी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर फरार झालेले अनंत सिंह दिल्लीच्या न्यायालयात शरण आले होते. या प्रकरणात ५ नोव्हेंबर २०१९ रोजी आरोपपत्र दाखल झाले होते. यावर जलदगती न्यायालयात ३४ महिने सुनावणी सुरू होती. २५ ऑगस्ट २०१९ पासून आनंत कुमार न्यायालयीन कोठडीत आहेत. या प्रकरणात पोलिसांचे १३ तर बचाव पक्षाचे ३४ साक्षीदार होते. त्यांच्या साक्ष तपासल्यानंतर न्यायालयाने आमदार अनंत सिंह यांना दोषी ठरवून १० वर्षांची शिक्षा ठोठावली. त्यांच्या घराच्या केयरटेकरलाही १० वर्षांची शिक्षा झाली आहे.