पाटणा – अग्नीपथ योजनेच्या विरोधात बिहारमध्ये सुरू झालेल्या आंदोलनामुळे येथून दिल्लीसह देशातील इतर प्रमुख शहरांदरम्यानची रेल्वे सेवा बंद केली होती. ती आता पुन्हा सुरू झाली आहे. दिल्ली, मुंबई आणि पुण्यासह इतर प्रमुख शहरांसाठी बिहारमधून आज ५० ट्रेन रवाना झाल्या.
सैनिक भरतीच्या अग्नीपथ योजनेविरोधात बिहारमध्ये मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते. त्यात त्यांनी रास्ता रोकोबरोबरच रेल्वेला लक्ष्य बनवले होते. अनेक गाड्यांचे डबे जाळले होते. रेल्वे इंजिन आणि रेल्वे स्थानक जाळले होते. या हिंसक आंदोलनामुळे बिहारमधून अन्य राज्यांमध्ये आणि शहरांमध्ये जाणाऱ्या रेल्वे गाड्या रद्द केल्या होत्या. मात्र आता परिस्थिती निवळल्यामुळे रेल्वेने पुन्हा ट्रेन सुरू केल्या आहेत. त्यातील ५० ट्रेन आज दिल्ली, मुंबई, पुणे आणि कोलकातासह अन्य शहरांसाठी सुटल्या.