बीड – बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करणाऱ्या इसमाचा आज पहाटे मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. वारंवार निवेदने आणि अर्ज देऊन देखील त्यांच्या मागणीकडे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून दुर्लक्ष केले गेले. त्यामुळेच त्यांच्यावर उपोषणाची वेळ आली आणि अखेर थंडीने कुडकुडल्यामुळे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, असा आरोप नातेवाईकांनी केलाय.
वासनवाडी येथील आप्पाराव पवार हे आपल्या कुटुंबीयांसह घरकुलाचे हप्ते मिळावे त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमर उपोषणाला बसले होते. गेल्या 4 दिवसांपासून प्रशासनाने त्यांच्या आंदोलनाची दखल न घेतल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. आणि यातच पहाटे आप्पाराव पवार यांचा मृत्यू झाला आहे. गेली अनेक वर्षापासून अप्पाराव पवार हे घरकुलाचे हप्ते मिळावेत आणि जमिनीवर ताबा मिळावा यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वेळोवेळी आंदोलन करत आहेत तरी देखील त्यांना प्रशासनाकडून न्याय मिळत नसल्याचा आरोप नातेवाईकांनी केला असून शेवटी आंदोलन करताना अप्पाराव यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.