संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 01 December 2022

बुलडाण्यात गरबा खेळताना आणखी एकाचा हृदयविकाराच्या धक्काने मृत्यू

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

बुलडाणा: राज्यभरात नवरात्रोत्सव यंदा धुमधडाक्यात साजरा होत आहे. पण मागील दोन दिवसांपासून गरबा खेळत असताना तरुणांचा हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. आता बुलडाण्यामध्ये एका ४२ वर्षीय इसमाचा हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यात येणाऱ्या जानेफळ या गावात ही घटना घडली आहे. विशाल पडधरीया असे या इसमाचे नाव आहे. या गावात वीर सावरकर नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीने गरबाचे आयोजन करण्यात आले होते. विशाल पडधरीया हे गरबा खेळण्यासाठी आले होते. गरबा खेळताना अचानक विशाल यांना हृदयविकाराचा धक्का बसला. त्यांना तातडीने स्थानिक रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केलं.

विशाल हे दरवर्षी मोठ्या उत्साहात गरब्यामध्ये सहभागी होत होते. मात्र यंदा गरबा खेळताना त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या मृत्यूने जानेफळ परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, नवरात्रीच्या उत्साहात काही तरुणांनी आपला जीव गमावला आहे. सलग दरदिवशी गरब्यामुळे तरुणाचा मृत्यू झाल्याची बातमी कानावर पडते आहे. महाराष्ट्रातच ४ आणि गुजरातमध्ये एक असे एकूण ५ बळी या नवरात्रीत गेले आहे.याबाबत माहिती देताना महाराष्ट्र आयएमएचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी सांगितलं की, गरबा जो एरोबिक एक्सरसाइझमध्ये येतो. यामध्ये संपूर्ण शारीरिक हालचाल होते. अशावेळी आरोग्याच्या काही समस्या असतील तर जीवावर बेतू शकतं. ज्यांचं हृदय कमकुवत आहे, हृदयाच्या समस्या आहेत, बीपी आहे, त्यांना गरबा खेळताना त्यांच्या हृदयावर ताण येऊन हार्ट अटॅक येऊ शकतो. कित्येक तरुण आहेत, ज्यांना ब्लड प्रेशरचा त्रास असतो पण त्यांनी तपासणी केलेली नसते, त्यामुळे त्यांना आपल्याला हा त्रास आहे हे माहिती नसतं आणि असा अचानक हार्ट अटॅक येतो, असं डॉ. भोंडवे म्हणाले. त्यामुळे सर्वांनी आपली वैद्यकीय तपासणी करावी आणि मगच गरबा खेळावा. किंबहुना गरबा आयोजक आहेत त्यांनीसुद्धा कार्यक्रमात सहभागी होणाऱ्यांसाठी वैद्यकीय तपासणी बंधनकारक केली तर उत्तम, असा सल्ला डॉ. भोंडवे यांनी दिला आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami