संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 30 November 2022

बेपत्ता कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा तत्त्वावर नोकरीची संधी

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई: सरकारी सेवेत कर्तव्य बजावताना मृत्यू ओढवल्यास कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील एका सदस्याला अनुकंपा तत्त्वावर शासकीय सेवेत सामावून घेतले जाते. मात्र शासकीय नोकरीत असताना बेपत्ता झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना नोकरीत घेण्याबाबत नेमका कोणता निर्णय घ्यावा याविषयी नियमामध्ये कोणतीही सुस्पष्टता नव्हती. यासाठी धोरणात बदल करण्याच्या मागणीचा विचार करून प्रचलित अनुकंपा तत्त्वावरील भरती धोरणात बदल करण्यकात आले असून, आता शासकीय नोकरीत कर्तव्यावर असताना बेपत्ता असलेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसाला अनुकंपा तत्त्वावरील नोकरीची संधी मिळणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सरकारी सेवेत कर्तव्य बजावताना मृत्यू ओढवल्यास संबंधित कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील एका सदस्याला अनुकंपा तत्त्वावर शासकीय सेवेत सामावून घेतले जाते. शासकीय नोकरीत असताना बेपत्ता झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना किमान तीन वर्षे ते कमाल सात वर्षे नोकरीसाठी प्रतीक्षा करावी लागते. अनुकंपा धोरणानुसार अशा बेपत्ता कर्मचाऱ्यांच्या वारसाला नोकरीत घेण्याबाबत नेमका कोणता निर्णय घ्यावा याविषयी नियमामध्ये कोणतीही सुस्पष्टता नव्हती. सरकारी धोरणात बदल करण्याची मागणी करण्यात येत होती. असेच तसेच सरकारी सेवेत अनुकंपा तत्त्वावरील उमेदवारांची प्रतीक्षा यादी ११ हजारांवर गेल्याने या यादीतील उमेदवारांना लवकर नोकरीची संधी मिळावी, अशी मागणी करण्यात येत आहे. यानुसार प्रचलित अनुकंपा तत्त्वावरील भरती धोरणात बदल केले आहेत. यामुळे बेपत्ता असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांस सक्षम न्यायालयाने मृत म्हणून घोषित केल्यानंतर त्याच्या कुटुंबातील पात्र सदस्यांपैकी एकाची अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती होऊ शकते. हा संबंधित कुटुंबाला फार मोठा दिलासा मानला जात आहे. तसेच नोकरीसाठी गट डमधून गट क वर्गात प्रतीक्षा सूचीमध्ये नाव समाविष्ट करण्याची संधीही उपलब्ध झाली आहे. मात्र त्यानंतर उमेदवाराने क गटाच्या नोकरीसाठी शैक्षणिक पात्रता संपादन केलेली असेल तर त्याला नोकरीसाठी गट बदलता येत नव्हता. मात्र यापुढे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत नोकरीचा गट बदलता येतो. यामुळे वरच्या गटातील नोकरीची संधी मिळणार आहे.
दरम्यान, अनुकंपा तत्त्वानुसार भरतीत बेपत्ता कर्मचाऱ्यांबाबत धोरणात सुधारणा करण्यात आली ही आनंदाची बाब असली तरी अनेक विभागात अनुकंपा तत्त्वावरील भरती झालेली नाही. अनेक उमेदवारांना संधी मिळत नाही. वय उलटून गेल्यामुळे त्यांना कायमचे सरकारी नोकरीपासून वंचित राहावे लागत आहे. सरकारने अशाही उमेदावारांना नोकरीची संधी द्यावी, अशीही मागणी आता होत आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami