मुंबई – मध्य रेल्वे मार्गावरील बहुचर्चित बेलापूर-उरण रेल्वे मार्गावर आता येत्या सप्टेंबर महिन्यात लोकलसेवा सुरू होण्याची दाट शक्यता आहे. या मार्गावरील पहिल्या टप्प्यातील बेलापूर ते खारकोपरपर्यंतची रेल्वेसेवा दोन वर्षांपूर्वीच सुरू झाली आहे. आता उर्वरित खारकोपर ते उरण या मार्गाचे कामही शीघ्र गतीने सुरू आहे. ही रेल्वे सेवा सुरू झाल्यावर मुंबईला आणखी २७ किलोमीटरचा चौथा नवा रेल्वे मार्ग उपलब्ध होणार आहे.
उरण ते बेलापूर दरम्यान लोकल सुरू करण्याची घोषणा १९९७ मध्ये करण्यात आली होती. मात्र यात अडथळे निर्माण झाल्याने ही घोषणा लांबणीवर पडली. मग २०१८ मध्ये बेलापूर ते नेरुळ ते खारकोपर हा १२.४ किमीचा मार्ग सुरू झाला. परंतु पुढील १४.६ किलोमीटरच्या रेल्वे मार्गाचे काम शीघ्र गतीने सुरू असल्याने ते सप्टेंबरमध्ये पूर्ण होऊन या मार्गावर लोकलसेवा सुरू होण्याचा अंदाज मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिलकुमार लाहोटी यांनी व्यक्त केला आहे. आतापर्यंत या मार्गाचे ७० टक्के काम पूर्ण झाले असून या मार्गाला जे एन पीटी आणि नवी मुंबई विमानतळही जोडले जाणार आहेत. त्याचप्रमाणे या मार्गावर पनवेल, जसई, जेएनपीटी क्रॉसिंग लाईन असणार आहे. या मध्य रेल्वेच्या चौथ्या मार्गावर १० स्थानके असतील. यात दोन मोठे पूल, ४६ छोटे पूल, ४ अंतर्गत पूल असणार आहेत.