संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 09 December 2022

बेस्टच्या नोटीसनंतर कंत्राटदाराकडून बससेवा बंद! मुंबईकर प्रवाशांचे हाल

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – मुंबई महापालिकेतील बेस्ट प्रशासनामध्ये कार्यरत असलेल्या भाडेतत्त्वावरील मिनी बस सेवा आणि आपल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर न देणाऱ्या एमपी ग्रुप कंपनीला बेस्ट उपक्रमाने नोटीस बजावून ३ कोटींचा दंड ठोठावला आहे.मात्र आता या नोटीसनंतर या कंत्राटदाराने आपली बससेवाच बंद केली आहे. मागील तीन दिवसांपासून या कंत्राटदाराच्या २८० पैकी २७० बसेस बंद असल्याने प्रवाशांचे फार हाल होत आहेत.दुसरीकडे या अचानक उद्भवलेल्या परिस्थितीमुळे बेस्ट उपक्रमावर मोठा पडला आहे.याआधी पीएनएम कंत्राटदार कंपनीनेही असाच बससेवेस नकार दिला होता.
एमपी ग्रुप कंपनीला ‘कंत्राट रद्द का करू नये’ अशा आशयाची नोटीस बजावत तीन कोटींचा दंड ठोठावला आहे.या नोटिशीला एक महिना लोटला तरीही कंत्राटदार कंपनीने त्याचे उत्तर सादर केलेले नाही. उलट हा दंड आकारू नये यासाठी प्रयत्न सुरू ठेवले. मात्र त्याला प्रशासनाने प्रतिसाद न दिल्याने कंत्राटदाराने बससेवाच बंद केल्याने या कंपनीच्या बसेस विविध आगारात धूळ खात उभ्या आहेत.या कंत्राटदाराच्या २८० पैकी तब्बल २७० मिनी बस सध्या सेवेत नाहीत.परिणामी, बेस्टच्या एकूण ताफ्यातील बसगाड्यांची संख्या रोडावली असून त्याचा प्रवासी सेवेवर परिणाम होऊ लागला आहे.बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात स्वमालकीच्या आणि भाडेतत्वावरील बसगाड्यांचा समावेश आहेत.एमपी ग्रुप कंपनीच्या २८० मिनी वातानुकूलित बस बेस्टच्या ताफ्यात होत्या.बस बिघडणे, वातानुकूलित यंत्रणा योग्य नसणे अशा तक्रारी बेस्ट उपक्रमाकडे सातत्याने येत होत्या.शिवाय या बसवर कंपनीने कंत्राटी चालक तसेच देखभालीसाठी यांत्रिकी कर्मचारी नियुक्त केले होते.वेतन आणि अन्य थकबाकीची रक्कम वेळेवर मिळत नसल्याने कंत्राटदाराचे कर्मचारी वारंवार काम बंद आंदोलन करीत होते.परिणामी,गेल्या काही महिन्यांपासून प्रवाशांचे हाल होत होते. त्यामुळे बेस्टने दंडात्मक कारवाई करण्यासाठी कंपनीवर वारंवार नोटीस बजावली होती.या नोटीसनाही योग्य उत्तर मिळत नसल्याने अखेर बेस्टने एक महिन्यापूर्वी कंत्राट रद्द करण्याबाबतची नोटीस या कंपनीला पाठविली होती.तसेच तीन कोटींचा दंडही ठोठावला होता.त्याचेही उत्तर अद्याप बेस्टला पाठविण्यात आलेले नाही.अजूनही कंपनीच्या उत्तराची प्रतीक्षा करीत असल्याचे बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी सांगितले.
दरम्यान,बेस्ट उपक्रमामध्ये एकूण ३६०० बसेस प्रवाशांच्या सेवेत उपलब्ध आहेत.त्यातील १८०० बसेस या भाडेतत्त्वावर चालवणार्‍या कंत्राटदार कंपनीच्या आहेत आणि उर्वरित १८०० बसेस बेस्टच्या मालकीच्या आहेत. सध्या बंद असलेल्या कंत्राटदाराच्या बसेस या वांद्रे,कुलाबा,विक्रोळी,कुर्ला आणि वडाळा या पाच आगारातून चालविल्या जात होत्या.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami