लंडन – अमेरिका आणि ब्रिटनने एलएनजी गॅस पुरवठा वाढवण्यासाठी भागीदारी सुरू केली आहे. दोन्ही देशांमध्ये आज याबाबत करार झाला आहे. ब्रिटनला अमेरिका एलएनजी गॅस पुरवठा करणार आहे. युक्रेनवर रशियाने केलेल्या आक्रमणानंतर ब्रिटन आणि इतर युरोपीय देशांनी रशिया एवजी अमेरिकेकडे वळले आहेत.याआधी ते रशियाच्या एलएनजी गॅस पुरवठ्यावर अवलंबून राहत होते. रशियावर अवलंबून राहणे त्यांना कमी करायचा आहे.
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, अमेरिकेशी केलेल्या भागीदारीमुळे ब्रिटीश ग्राहकांसाठी ऊर्जेच्या किमती कमी होतील आणि युरोपचे रशियन ऊर्जेवरील अवलंबित्व संपुष्टात आणण्यास मदत होईल. नवीन ब्रिटन -अमेरिका एनर्जी सिक्युरिटी अँड अफोर्डेबिलिटी पार्टनरशिप’ अंतर्गत अमेरिका पुढील वर्षभरात ब्रिटन टर्मिनल्सद्वारे किमान 9-10 अब्ज घनमीटर एलएनजी निर्यात करेल. ही निर्यात गेल्या वर्षीपेक्षा दुप्पट असेल. युक्रेनवर रशियाच्या आक्रमणानंतर घरगुती गॅस बिलांनी या वर्षी विक्रमी उच्चांक गाठला आहे. अमेरिका एनर्जी इन्फॉर्मेशन अॅडमिनिस्ट्रेशन डेटानुसार2022 च्या पहिल्या सहामाहीत अमेरिका जगातील सर्वात मोठा एलएनजी निर्यातदार बनला आहे.अमेरिकेने आपली निर्यात क्षमता झपाट्याने वाढवली असून युरोपमध्ये जास्त प्रमाणत निर्यात झाली.