हैदराबाद- गेल्या काही दिवसांपासून हैदराबादमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत पाहायला मिळत आहे. अशाच भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात ४ वर्षाच्या चिमुरड्याचा मृत्यू झाला आहे.कुत्र्यांच्या हल्ल्यापासून वाचण्याचा मुलाने प्रयत्न केला पण तो स्वत:चे प्राण वाचवू शकला नाही.ही काळीज पिळवटून टाकणारी संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
या चिमुरड्याच्या ६ वर्षीय बहिणीने कुत्र्यांच्या हल्ल्याची माहिती वडिलांना दिली.मुलाचे वडील गंगाधर हे जखमी मुलाला घेऊन खासगी रुग्णालयात पोहोचले.मात्र उपचारापूर्वीच त्याचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. निजामाबादचे रहिवासी असलेले गंगाधर हैदराबादमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात.गंगाधर आपल्या मुलाला घेऊन काम करत असलेल्या ठिकाणी घेऊन आले होते.मुलगा खेळत असताना अचानक भटक्या कुत्र्यांच्या टोळक्याने मुलावर हल्ला चढवला.हा मुलगा धावत कुठेतरी जात असताना मागून तीन कुत्र्यांनी येऊन त्याच्यावर हल्ला केला.