भविष्यातील आपली जीवनशैली नियमित ठेवण्यासाठी प्रत्येकाने योग्य नियोजन करायलाच हवे. तुम्ही निवृत्तीनंतर काय करणार आहात आणि त्यासाठी आर्थिक आवश्यकता काय असणार आहेत, याचा स्पष्ट अंदाज तुम्हाला आजच्या दिवशी असायला पाहिजे.
तुमची जगभ्रमंती करायची इच्छा असेल, एखादा छंद जोपासायचा असेल किंवा नव्या ठिकाणी जाऊन राहायचे असेल तर त्यासाठी तत्कालिक आणि दीर्घकालीन किती खर्च येऊ शकतो, याची स्पष्ट कल्पना तुम्हाला असली पाहिजे. त्याचप्रमाणे तुमच्या मुलांचा पदवीपर्यंतचा किंवा पदव्युत्तर शिक्षणाचा खर्च आणि तुमच्यासाठी व तुमच्या जोडीदारासाठी दीर्घकालीन आरोग्यसेवा व मदतीचा खर्च यासारख्या खर्चांचा विचार तुम्ही करणे आवश्यक आहे. तुम्हाला जे करायचे आहे त्याचे अत्यावश्यक पैलू तुम्ही ओळखणे आवश्यक आहे. त्यामुळे तुम्ही खर्चाचे वर्गीकरण करू शकाल आणि अनावश्यक खर्च टाळू शकाल. जसे, प्रवास म्हणजे सलग काही महिने लक्झरी क्रूझने प्रवास करणे असे नाही. तुमच्या निवृत्तीपश्चात योजना किंवा कार्यक्रम तुम्ही निश्चित केला की तुम्ही तुमची सध्याची बचत आणि गुंतवणुकीच्या स्थितीचा आढावा घ्या. तुमचा भविष्यातील खर्च भागविण्यासाठी व्यवहारिकदृष्ट्या तुमच्या उत्पन्नाचा किती हिस्सा तुम्ही सध्या बाजूला काढून ठेवू शकता, याची चाचपणी करा. बचत आणि गुंतवणूक तुमच्या सध्याच्या गरजांशी सुसंगत कशी होऊ शकेल हेही पाहा. तुमच्या सध्याच्या जीवनशैलीशी तडजोड न करता भविष्यात तुम्हाला हवे असलेले उत्पन्न मिळविण्यासाठी तुमच्या गुंतवणुकीवर कशा प्रकारचा परतावा तुम्हाला गरजेचा असेल हे ध्यानात घ्या.