भाईंदर – मीरा -भाईंदर शहरात नुकत्याच उद्घाटन झालेल्या पहिल्याच स्व. लता मंगेशकर नाट्यगृहातील पहिलाच मराठी नाटकाचा प्रयोग ध्वनीक्षेपक यंत्रणा व प्रकाशयोजनेतील समस्या यामुळे रद्द करण्यात आला होता.हे नाटक पुढे ढकलावे लागले.मात्र त्यानंतर या नाट्यगृहातील पहिल्या नाटकाचा श्रीगणेशा एका मल्याळी नाटकाने करण्यात आल्याने मराठी नाट्यप्रेमींमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.
या नाट्यगृहात पहिला प्रयोग रविवार १३ नोव्हेंबरला अभिनेते गिरीश ओक यांच्या ३८ कृष्ण व्हिला या नाटकाचा होणार होता.मात्र त्याच्या काही दिवस अगोदर नाट्यगृह व्यवस्थापकांनी नाट्यगृहाची पाहणी केली असता नाट्यगृहातील ध्वनीक्षेपक यंत्रणातील बिघाड आणि आवश्यक असलेल्या प्रकाशाची सुविधा सुरळीत नसल्याचे आढळले. त्यामुळे नाटक रद्द करण्याचा निर्णय त्यांनी घेतला.मात्र त्यानंतर काही दिवसांत या नाट्यगृहात केरळ संस्कार वेदी या संस्थेच्या ‘विणालवधी” मल्याळी नाटकाचा प्रयोग पार पडला. म्हणजेच या नव्या पहिल्या नाट्यगृहाची घंटा मराठी ऐवजी मल्याळी नाटकाने झाली हे स्पष्ट झाले.त्यामुळे मराठी नाट्यसृष्टीत नाराजी व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, या नाट्यगृहाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते करण्यात आले आहे.या नाट्यगृहाचे संपूर्ण बांधकाम हे १ लाख १० हजार फुटांचे आहे. त्यात एक मोठे नाट्यगृह असून त्यात १ हजार सीट्स आहेत.तर छोट्या नाट्यगृहात ३०० सीट्स आहेत. तिसर्या व चौथ्या मजल्यावर आर्ट गॅलरी तयार करण्यात आली आहे. बेसमेंटमध्ये व तळमजल्यावर पार्किंगची सुविधा तयार करण्यात आली आहे.आर्ट गॅलरी, वेटिंग हॉल, कॅफेटेरिया , व्हीआयपी रूम, ग्रीन रम अशा सुविधा असून ६ लिफ्ट नाट्यगृहात आहेत. संपूर्ण वातानुकूलित असलेल्या या नाट्यगृहात बसण्याची आसन व्यवस्थाही करण्यात आली आहे.या नाट्यगृहाची ध्वनी यंत्रणा म्हणजेच साउंड सिस्टीम आधुनिक पद्धतीची असून मुंबईतील मोठ्या कंपनीने साउंड सिस्टीम, विद्युतीकरण,प्रकाश व्यवस्था येथे केली आहे. मात्र ती पुरेशी चालत नाही,
त्यामुळेच कलाकारांनी पहिलाच प्रयोग रद्द केल्यानेच नाट्यप्रेमी रसिकांना निराशेला सामोरे जावे लागले आहे.