नवी दिल्ली – संपूर्ण जगाचे लक्ष सध्या रशिया-युक्रेन युद्धाकडे आहे. या युद्धाच्या वातावरणातही सायबर हल्ल्यांना उधाण आले आहे. भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचे ट्विटर अकाउंट आज हॅक झाले होते. रशिया आणि युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर नड्डा यांच्या ट्वीटर अकाउंटवरून काही ट्वीट करण्यात आले. ‘युक्रेनच्या मदतीसाठी उभे राहा, क्रिप्टोकरन्सीचे दान स्वीकारले जातेय’, असे आवाहन त्यातून केले गेले. तसेच ‘सॉरी माझे अकाउंट हॅक झाले आहे. येथे रशियाला दान करण्यासाठी कारण त्यांना मदतीची आवश्यकता आहे’, असे ट्विटही करण्यात आले होते. इतकेच नाही, तर हॅकर्सनी त्यांच्या प्रोफाइलचे नाव बदलून ‘ICG OWNS INDIA’ असे लिहिले होते.
मात्र नड्डा यांचे अकाउंट हॅक झाल्याचे कळताच अर्ध्या तासात ते सुरक्षित करण्यात आले. त्यानंतर सर्व विवादित ट्विट हटविण्यात आले. यासंदर्भात बोलताना जेपी नड्डा म्हणाले, अकाउंट हॅक होण्यामागचे नेमके कारण जाणून घेण्यासाठी आपण ट्विटरशी बोलत आहोत. दरम्यान, यापूर्वी मागील वर्षी डिसेंबर महिन्यात पंतप्रधान मोदींचे ट्वीटर अकाउंटही हॅक झाले होते. तेव्हादेखील क्रिप्टोकरन्सीबाबत ट्विट करण्यात आले होते. या प्रकरणाची दखल ट्वीटरकडून घेण्यात आली होती. त्यानंतर त्वरित मोदींचे ट्वीटर अकाउंट सुरक्षित करण्यात आले.