तुळजापूर – महाराष्ट्राच्या सतेत एकत्र असलेल्या भाजप – शिंदे गटातील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलेला आहे. तुळजापूरचे भाजप आमदार राणा जगजितसिंग पाटील यांनी आरोग्य मंत्री आणि शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची थेट पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रार केली आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांमध्ये सारे काही आलबेल नसल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे.
तुळजापूरचे भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजी सावंत हे जिल्हानियोजन समितीच्या निधीचे वाटप नियमानूसार करत नसल्याची तक्रार थेट नियोजन विभागाच्या प्रधान सचिवांकडे केली आहे. १३ फेब्रुवारी रोजी राणा पाटील यांनी या संदर्भातील पत्र आणि निधीवाटपात केलेला भेदभाव याच्या पुराव्यांच्या यादीसह मंत्रालयात पाठवले.
या पत्राची तातडीने दखल घेत प्रधान सचिव कार्यालयाने उस्मानाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून मुद्देनिहाय सविस्तर माहिती पाठवण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात राणापाटील विरुद्ध सावंत असा राजकीय संघर्ष पेटण्याची चिन्ह आहेत. नुकत्याच झालेल्या मराठवाडा शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत राणापाटील यांनी शिंदे गटाच्या जिल्ह्यातील आमदार, मंत्र्यांना विश्वासात घेतले नाही, असा आरोप पालकमंत्री सावंत यांच्याकडून करण्यात आला होता.
शिक्षक मतदारसंघाची जबाबदारी राणापाटील यांच्यावर सोपवण्यात आली होती. पण शिंदे गटाला विश्वासात न घतेल्यामुळे भाजप उमेदवाराचा पराभव झाला, असा आरोप देखील करण्यात आला होता. हा वाद ताजा असतांनाच आता पालकमंत्र्यांवर निधी वाटपात भेदभाव केला जात असल्या आरोप आणि त्याची थेट प्रधान सचिवांकडे तक्रार केल्याने राणा पाटील- तानाजी सावंत यांच्यातील दरी आणखी वाढण्याची शक्यता आहे.