संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 01 December 2022

भायखळ्याजवळ रुळावर खडीचा ड्रम! मोटारमनच्या सतर्कतेने अनर्थ टळला

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई- गणेशोत्सवाची सर्वत्र धामधूम सुरू असताना मुंबईत धक्कादायक घटना घडली. अज्ञात समाजकंटकांनी मध्य रेल्वेच्या भायखळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान जलद रेल्वे मार्गावर मशिद बंदरजवळ खडी व दगडांनी भरलेला २० किलोचा लोखंडी ड्रम ठेवला. मात्र मोटारमनच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टाळला. ही घटना शुक्रवारी दुपारी ३ वाजून १० मिनिटांनी घडली. जलद लोकलने ड्रमला धडक दिली. मात्र ती रुळावरून घसरली नाही. त्यामुळे मोठा अपघात टाळला.

मुंबईवर दहशतवादी हल्ला चढवण्याची धमकी देणारा मेसेज आला आहे. त्यामुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. कोरोनाच्या २ वर्षांच्या निर्बंधानंतर यंदा मुंबईसह सर्वत्र गणेशोत्सव उत्साहात साजरा केला जात आहे. असे असताना मध्य रेल्वेच्या भायखळा रेल्वे स्थानकाजवळ धक्कादायक प्रकार घडला. खोपोली येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जात असलेल्या जलद लोकलच्या मार्गावर भायखळा ते सॅण्डहर्स्ट रोड दरम्यान खडीने भरलेला २० किलोचा लोखंडी ड्रम ठेवला होता. त्याला ही लोकल वेगाने धडकली असती तर ती रुळावरून घसरून मोठा अपघात झाला असता. मात्र लोकलचा मोटारमन अशोक शर्मा याने प्रसंगावधान राखून ड्रम दिसताच लोकलचे इमर्जन्सी ब्रेक दाबले. त्यामुळे तिचा वेग कमी झाला. त्यानंतरही तिने ड्रमला धडक दिली. परंतु ती रुळावरून घसरली नाही. या घटनेमुळे लोकलमधील प्रवासी घाबरले. नंतर मोटारमनने याची माहिती नियंत्रण कक्षाला दिली. ही घटना शुक्रवारी दुपारी ३.१० वाजता घडली. नंतर रेल्वे पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवला. या घटनेचा तपास करण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. सध्या गणेश उत्सवाच्या बंदोबस्तात पोलिस गुंतल्याने समाजकंटकांनी घातपात घडवण्याचा हा प्रयत्न केला. मात्र मोटारमनच्या सतर्कतेमुळे तो उधळला गेला.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami