नवी दिल्ली : भारत स्वतंत्र झाल्यानंतर देशाचे पहिले मतदार अशी इतिहासात नोंद असणारे श्याम सरण नेगी यांनी आज पहाटेच्या सुमारास अखेरचा श्वास घेतला. नेगी यांनी 2 नोव्हेंबर रोजी हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी पोस्टल मतदान केले होते. नेगी हे हिमाचल प्रदेशातील किन्नौर येथील मूळ रहिवाशी असून ते 106 वर्षाचे होते. त्यांनी मतदानाचा बॅलेट पेपर ते ईव्हीएमपर्यंतचा संपूर्ण प्रवास अनुभवला आहे.
भारत स्वतंत्र झाल्यानंतर देशात लोकसभेसाठी 25 ऑक्टोबर 1951 रोजी पहिल्यांदा मतदान झाले. त्यात भारताचे पहिले मतदार म्हणून नेगी यांनी २५ ऑक्टोबर १९५१ रोजी पहिल्यांदा मतदान केले होते. हिमाचलच्या किन्नोर जिल्ह्यातील एका शाळेतल्या मतदान केंद्रात जाऊन त्यांनी मतदानाचा हक्क बजावला होता. या मतदानाच्या दिवशी आपला हक्क बजावणारा पहिला मतदार म्हणून त्यांची दखल घेत इतिहासात नोंद करण्यात आली. नेगी यांचा जन्म 1 जुलै 1917 रोजी झाला असून ते एक निवृत्त शिक्षक होते,अशी माहिती आहे. श्याम सरण नेगी यांनी अलीकडेच मतदानासाठीचा १२-डी फॉर्म परत केल्यामुळे ते चर्चेत आले होते. प्रत्यक्षात मतदान केंद्रावर जाऊन मतदान करणार असल्याचं सांगत त्यांनी निवडणूक आयोगाचे फॉर्म परत केले होते. मात्र, त्याचदरम्यान त्यांची प्रकृती अचानक बिघडल्यांनी त्यांनी पोस्टल मतदान केले होते. नेगी यांनी आतापर्यंत 33 वेळा मतदान केले आहे. त्यांच्या निधनाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह अनेकांनी शोक व्यक्त केला आहे.