सिंगापूर – भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू हिने सिंगापूर ओपन २०२२ मध्ये विजेतेपद पटकावत ऐतिहासिक कामगिरी केली. दोनवेळा ऑलिम्पिक पदक विजेती असलेल्या पीव्ही सिंधूने अंतिम फेरीत चीनच्या वांग जी यीचा २१-९, ११-२१, २१-१५ असा पराभव केला.
जागतिक क्रमवारीत सातव्या क्रमांकावर असलेल्या पीव्ही सिंधूने उपांत्य फेरीत जपानच्या सायना कावाकामीला पराभूत केले होते. सिंधूने उपांत्य फेरीत २१-१५, २१-७ अशा फरकाने सहज विजय मिळवला होता. त्यावेळी जपानी खेळाडू कावाकामी एकदाही सिंधूवर भारी पडलेली दिसली नाही. परंतु सिंधूसाठी जागतिक क्रमवारीत अकराव्या क्रमांकावर असलेल्या वांग जी यीला पराभूत करणे सोपे नव्हते. तीन गेम रंगलेल्या या सामन्यात सिंधूने विजयी सुरुवात केली. तिने पहिल्या गेममध्ये वांगचा २१-९ असा लाजिरवाणा पराभव केला. मग वांगने पुनरागमन करत दुसरा गेम ११-२१ने जिंकून सामना बरोबरीत आणला. इथून तिसऱ्या गेमला सुरुवात झाली, जो अतिशय रोमांचक होता. सुरुवातीच्या ८-१० गुणांपर्यंत दोन्ही खेळाडूंमध्ये बरोबरीची लढत होती. परंतु सिंधूने हळूहळू सामन्यावर पकड घेत तिसरा गेम २१-१५ अशा फरकाने जिंकून विजेतेपद पटकावले.
पीव्ही सिंधू सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करताना दिसत आहे. यावर्षी मार्चमध्ये झालेल्या स्विस ओपननंतर तिने प्रथमच आता एखाद्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. तिने स्विस विजेतेपदावरही आपले नाव कोरले होते. स्विस ओपन सुपर ३०० बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत सिंधूने थायलंडच्या बुसानन ओंगबामरुंगफानचा २१-१६, २१-८ असा पराभव केला होता. तर आता तिने सिंगापूर ओपन जिंकून भारताच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.