नवी दिल्ली – केंद्र सरकार लवकरच देशात लोकसंख्या नियंत्रण विधेयक आणणार असल्याचा दावा केंद्रीय मंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी केला आहे. छत्तीसगडमधील रायपूर येथे गरीब कल्याण संमेलनादरम्यान मंत्र्यांनी ही घोषणा केली. लोकसंख्या नियंत्रणाबाबत कायदा आणण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत असली, तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या सभेत हा मुद्दा उपस्थित केला होता. त्यामुळे राज ठाकरे यांच्या आवाहनानंतर लोकसंख्या नियंत्रण विधेयकचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
लोकसंख्येत भारत २०२७ पर्यंत चीनला मागे टाकेल आणि जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनण्याचा अंदाज संयुक्त राष्ट्रांनी व्यक्त केला होता, असे लोकसंख्या अभ्यासाच्या चिनी तज्ज्ञांच्या एका अहवालात उल्लेख केला आहे. त्यामुळे आता केंद्र सरकार लोकसंख्या नियंत्रणासाठी लवकरच कायदा आणण्याच्या तयारीत आहे. केंद्रीय मंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी याबाबत माहिती दिली. याआधी काही दिवसांपूर्वीच जाहीर सभेला संबोधित करताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्र सरकारला लोकसंख्या नियंत्रण कायदा आणण्याचे आवाहन केले. यासोबतच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे समान नागरी कायदा लागू करण्याची मागणीही केली होती.
लोकसंख्या नियंत्रण कायद्याबाबत विविध पक्षांची विविध मते आहेत. एमआयएमसारख्या पक्षाचा या कायद्याला विरोध आहे. मात्र तरीही एमआयएम या पक्षाचे आमदार इझहर असफी यांनी पक्ष विचारसरणीपासून वेगळा निर्णय घेत, लोकसंख्या नियंत्रण कायद्याला पाठींबा दिला होता. तसेच केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकार राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही लोकसंख्या नियंत्रण कायद्याबाबत राज ठाकरेंना पाठिंबा दिला होता. मात्र अनेक पक्ष या कायद्याच्या विरोधात आहेत. त्यामुळे हे विधेयक वादग्रस्त ठरणार आहे.