नवी दिल्ली – जगभरातील कोरोना रुग्णसंख्येने तब्बल ५४ कोटींचा टप्पा पार केला आहे. भारतातही पुन्हा एकदा कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. रुग्णांच्या वाढत्या संख्येने प्रशासनाची चिंता आणखी वाढली आहे. देशात आज सकाळी पावणे दहा वाजेपर्यंतच्या २४ तासांत कोरोनाचे १२ हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले. एकूण १२ हजार २१३ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर ११ रुग्णांचा मृत्यू झाला. यासह देशातील कोरोनाबळींचा आकडा आता ५ लाख २४ हजार ८०३ वर पोहोचला आहे. तसेच देशात सध्या ५८ हजार २१५ कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत.
देशातील पाच राज्यांत कोरोनाचे थैमान पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र, केरळ, दिल्ली, कर्नाटक आणि हरियाणामध्ये सर्वाधिक रुग्ण आढळून आले. महाराष्ट्रात ४ हजार ०२४, केरळमध्ये ३ हजार ४८८, दिल्लीत १ हजार ३७५, कर्नाटकात ६४८ आणि हरियाणामध्ये ५९६ रुग्ण आढळले आहेत. दरम्यान, बुधवारी महाराष्ट्रात एकीकडे ४ हजार ०२४ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली, तर दुसरीकडे ३ हजार ०२८ कोरोना रुग्ण बरे झाले. तसेच दोघांचा मृत्यू झाला. आता महाराष्ट्रात सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या १९ हजार २६१ इतकी आहे.