चागुरामास – भारतीय संघ लवकरच वेस्ट इंडिजविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळणार आहे. यासाठी यजमान वेस्ट इंडिजने आपला संघ जाहीर केला आहे. वेस्ट इंडिजने निकोलस पूरनची कर्णधारपदी निवड केली असून शाई होपवर उपकर्णधारपद सोपविले आहे.
शिखर धवनच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघ वेस्ट इंडिजविरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. यासाठी रवींद्र जडेजाकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर, बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत दमदार कामगिरी केल्यानंतर निकोलस पूरन वेस्ट इंडिज संघाचे नेतृत्त्व करणार आहे. बांगलादेशने एकदिवसीय मालिकेत वेस्ट इंडिजचा ०-३ असा पराभव केला, मात्र तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात पूरनने ७३ धावांची खेळी केली, तर तिसऱ्या टी-ट्वेन्टीमध्ये त्याने ३९ चेंडूत ७४ धावा केल्या.
विशेष म्हणजे वेस्ट इंडिज संघात जेसन होल्डर या स्टार खेळाडूचे पुनरागमन झाले आहे. हा अनुभवी अष्टपैलू खेळाडू बांगलादेशविरुद्धच्या मागील टी-ट्वेन्टी मालिकेत वेस्ट इंडिज संघाचा भाग नव्हता, परंतु क्रिकेट वेस्ट इंडीज निवड समितीने त्याला भारताविरुद्धच्या मालिकेसाठी मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतला. या निमित्ताने सात महिन्यांनंतर होल्डरचे वेस्ट इंडिज संघात पुनरागमन झाले आहे. ‘जेसन हा जगातील अव्वल अष्टपैलू खेळाडूंपैकी एक आहे हे आपल्या सर्वांनाच माहित आहे. त्यामुळे तो संघात परत आल्याने आम्हाला आनंद होत आहे’, असे क्रिकेट विंडीजने म्हटले. दरम्यान, क्वीन्स पार्क ओव्हलवर २२, २४ आणि २७ जुलै रोजी भारत विरुद्ध वेस्ट इंडिज तीन एकदिवसीय सामने खेळवले जातील.
वेस्ट इंडिजचा संघ : निकोलस पूरन (कर्णधार) शाई होप, शमर्ह ब्रूक्स, कीसी कार्टी, जेसन होल्डर, अकील हुसेन, अल्झारी जोसेफ, ब्रेंडन किंग, कायले मेयर्स, गुडाकेश मोती, कीमो पॉल, रोव्हमन पॉवेल, जेडेन सील्स.