वॉशिंग्टन
भारतीय वंशाच्या प्रमिला जयपाल यांची अमेरिकेतील हाऊस ज्युडिशिअरी कमिटीच्या इमिग्रेशनसंदर्भातील पॅनेलमध्ये रँकिंग सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आली आहे. उपसमितीचे नेतृत्व करणाऱ्या त्या पहिली स्थलांतरीत व्यक्ती ठरल्या आहेत.
इमिग्रेशन इंटिग्रिटी, सिक्युरिटी अँड एनफोर्समेंट या उपसमितीच्या महिला सदस्य जो लोफग्रेन यांच्या जागी 57 वर्षीय प्रमिला जयपाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रमिला जयपाल म्हणाल्या की, ‘मी 16 वर्षांची असताना एकटीच अमेरिकेत आले होते. मात्र, अमेरिकन नागरिक होण्यासाठी मला 17 वर्षे वाट पाहावी लागली. हे स्वप्न अजूनही अनेक स्थलांतरीतांच्या अवाक्याबाहेर आहे. सन्मान, माणुसकी आणि न्याय या भूमिकेतून इमिग्रेशन प्रणाली पुन्हा सुरू करण्याच्या प्रक्रियेत मी असून ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे.’