भोपाळ: भारत जोडो यात्रेत राहुल गांधींसोबत काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी-वाड्रादेखील सहभागी झाल्या आहेत. मध्यप्रदेशाच्या बुऱ्हानपूर येथे या यात्रेत प्रियांका गांधी सहभागी झाल्या होत्या. यावेळी त्यांचे पती राबर्ट वाड्रा यांच्यासह त्यांचा मुलगा देखील पदयात्रेत सहभागी झाले होते. मध्यप्रदेशात भाजप सरकार असून येथे ही यात्रा १० दिवस चालणार आहे.
राहुल गांधी आणि प्रियंका यांच्यासोबत राजस्थान काँग्रेसचे नेते सचिन पायलटही यात्रेत सहभागी झाले होते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ आणि दिग्विजय सिंहदेखील या यात्रेत सहभागी झाले आहेत.ही यात्रा मध्य प्रदेशातील पाच लोकसभा मतदारसंघातून भारत फिरणार आहे. त्यात खांडवा, खरगोन, इंदूर, उज्जैन आणि देवास यांचा समावेश आहे. या सर्व जागा भाजपच्या ताब्यात आहेत.
मध्यप्रदेशातील बुऱ्हाणपूर जिल्ह्यात बोदरली गावात भारत जोडो यात्रेचा पहिला थांबा होता. येथे गांधी यांचे स्वागत करण्यात आले व बंजारा कलावंतांनी लोककला सादर केली. दरम्यान, मध्य प्रदेशातील पहिल्या भाषणात राहुल गांधी यांनी भाजपवर जोरदार टीका केली. ट्रान्स्पोर्टनगर येथील जाहीर सभेत बोलताना गांधी यांनी बुऱ्हाणपूर हे प्रेमाचे शहर आहे. हाच प्रेमाचा संदेश घेऊन आपण श्रीनगरला पोहोचणार आहोत, असे त्यांनी म्हटले आहे.