मुंबई – काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांची ‘भारत जोडो यात्रे’ आज नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथे दाखल झाली आहे. या यात्रेत आदित्य ठाकरे सहभागी होणार की नाहीत यावर राजकीय वर्तुळात चर्चा सूरु असतानाच ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रेत सहभागी होणार असल्याची माहिती ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांनी दिली आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे भारत जोडो यात्रेत सहभागी होण्याची शक्यता कमी असल्याचे म्हटले आहे.
या यात्रेला पक्षाचे नवनिर्वाचित अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे उपस्थित राहणार आहेत. 10 नोव्हेंबर रोजी नांदेडमधील सभेमध्ये ते सहभागी होणार असल्याचे पक्षातर्फे सांगण्यात आले. भारत जोडो यात्रेचा १४ दिवस महाराष्ट्रात मुक्काम असेल.या १४ दिवसांमध्ये राहुल यांच्या दोन मोठ्या सभा सुद्धा होणार आहेत. त्यातील पहिली सभा 10 नोव्हेंबरला नांदेडमध्ये होईल, तर दुसरी सभा 18 नोव्हेंबरला शेगावात होणार आहे. काँग्रेस नेते अशोक चव्हाण, नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेत भारत जोडो यात्रेबद्दल माहिती दिली. भारत जोडो या यात्रेची महाराष्ट्रातील जबाबदारी अशोक चव्हाण यांच्याकडे आहे.
दरम्यान भारत जोडो यात्रेतील सहभागी मान्यवरांसाठी भोजनाची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये थालीपीठ, आंबट वरण, बाजरीची भाकरी, पिठले, दही-धपाटे, शेवभाजी, वांग्याचे भरीत हा मेन्यू असल्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.