ढाका : भारत-बांगलादेशला जोडणाऱ्या पद्मा पूलाचे महत्व व्यापार आणि अर्थव्यवस्थेला गती देणारे ठरणार आहे. रविवारी पंतप्रधान शेख हसीना यांच्या हस्ते पद्मा पुलाचे उद्घाटन करण्यात आले. णि भारत-बांगलादेशला जोडणारा बहुप्रतिक्षित पद्मा पूल रविवारी सकाळी ६ वाजल्यापासून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. पहिल्याच दिवशी हा पूल ओलांडण्यासाठी शेकडो वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, ६ लेनचा रस्ता आणि खाली रेल्वे ट्रॅक असलेला हा पूल बांगलादेशासाठी त्याच्या सुवर्ण भविष्याच्या दिशेने एक मोठे पाऊल मानले जात आहे. बांगलादेशातील हा सर्वात लांब आणि आव्हानात्मक पूल राष्ट्रीयत्वाचे प्रतीक मानले जात आहे. सुमारे ६ किमी लांबीचा हा पूल देशाच्या दक्षिण-पश्चिम भागांना मुख्य प्रवाहाशी जोडेल. यामुळे व्यापारात तेजी आणि बांगलादेशच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळण्याची अपेक्षा आहे. हा पूल कार्यान्वित झाल्यामुळे देशाच्या जीडीपीमध्ये १.२३ टक्क्यांनी वाढ होण्याची अपेक्षा आहे. हा बहुउद्देशीय रेल्वे-रोड पूल, ६.१५ किमी लांब आणि २१.६५ मीटर रुंद, पद्मा नदीवर बांधला आहे, जी बांगलादेशातील सर्वात मोठी आणि धोकादायक नदी मानली जाते. यावर रस्ते वाहतूक सुरू झाल्यामुळे पश्चिमेकडील काही भाग थेट राजधानी ढाकाशी जोडले जातील. पद्मा नदीमुळे बांगलादेशच्या दक्षिण-पश्चिम भागांना वेगळे राहावे लागत होते आता मुख्य प्रवाहात सामील होतील. तेथे राहणाऱ्या सुमारे ३ कोटी लोकांना याचा फायदा होणार आहे.
दरम्यान, २१ वर्षांपूर्वी झालेल्या या पुलाची पायाभरणी जागतिक बँकेने १.२ अब्ज डॉलरची मदत जाहीर केली असतानाही बांधकामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत सुमारे दशकभरापूर्वी ही योजना रद्द करण्यात आली होती. यानंतर बांगलादेशने स्वत:च्या पैशातून त्याचे बांधकाम केले. ७ वर्षांपूर्वी पुलाच्या बांधकामाला सुरुवात झाली होती. हा पूल ओलांडण्यासाठी मोटारसायकलला १०० रुपये, तर बसला २४०० रुपये आणि मध्यम आकाराच्या ट्रकला २८०० रुपये द्यावे लागतील.