नवी दिल्ली – भारत आणि बांगलादेश दरम्यानची बससेवा आजपासून पुन्हा सुरू झाली. कोरोना महामारीमुळे ही सेवा दोन वर्षांपासून बंद होती. आज ढाका येथे ढाका-कोलकाता-ढाका बसला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. यापूर्वी २९ मे रोजी दोन्ही देशांमधली रेल्वे सेवादेखील पुन्हा सुरू झाली होती.
India-Bangladesh bus service resumes after two years
— ANI Digital (@ani_digital) June 10, 2022
Read @ANI Story | https://t.co/Y8KgRr3k8W#IndiaBangladesh #IndiaBangladeshBusService pic.twitter.com/AuLd4H1mxj
भारत आणि बांगलादेश दरम्यान दोन रेल्वे धावतात. एक कोलकाता आणि खुलना दरम्यानची बंधन एक्सप्रेस आणि दुसरी मैत्री एक्सप्रेस कोलकाता आणि ढाक्याला जोडते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च २०२०पासून ही रेल्वे सेवा बंद करण्यात आली होती जी मेअखेरीस पुन्हा सुरू झाली. तर आता बस सेवा पुन्हा सुरू झाली आहे. बांगलादेशची राजधानी ढाका येथील भारतीय उच्चायुक्तांनी ट्विट करून म्हटले, ‘भारत-बांगलादेश सीमापार बससेवा पूर्ववत करण्यात आली आहे. भारत-बांगलादेश बससेवा आगरतळा-अखौरा आणि हरिदासपूर-बेनापोल मार्गे पुन्हा सुरू झाली. ढाका-कोलकाता-ढाका बसला आज सकाळी ढाका येथे हिरवा झेंडा दाखवण्यात आला. परवडणाऱ्या आणि लोककेंद्रित सेवेला चालना देणे हा यामागचा उद्देश आहे.’
बांगलादेश रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनचे (बीआरटीसी) अध्यक्ष ताझुल इस्लाम यांनी ही बससेवा सुरू होणार असल्याची माहिती गुरुवारी दिली होती. त्यांनी सांगितले होते की, ढाका-सिल्हेट-शिलाँग-गुवाहाटी-ढाका मार्ग वगळता शुक्रवारपासून इतर चार मार्गांवर सेवा पुन्हा सुरू होतील. पहिली बस शुक्रवारी सकाळी ७.०० वाजता ढाक्याच्या मोतीझील येथून सुटेल. दरम्यान, कोरोनामुळे ही सेवा बंद होण्यापूर्वी पाच मार्गांवर बस धावत होत्या. ढाका-कोलकाता-ढाका, ढाका-अगरतळा-ढाका, ढाका-सिल्हेट-शिलाँग-गुवाहाटी-ढाका, आगरतळा-ढाका-कोलकाता-अगरतळा आणि ढाका-खुलना-कोलकाता-ढाका या मार्गांवर बस धावत होत्या. आता पाचव्या मार्गावरून बस सुरू करण्याबाबतही चर्चा सुरू असल्याचे बीआरटीसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.