दिसपूर :- आसाम सरकारने मंगळवारी एक जाहिरात जारी करून देशातील भीमाशंकर नावाचे सहावे ज्योतिर्लिंग आसाममध्ये असल्याचा दावा आसामचे मुख्यमंत्री हिमंत विश्व शर्मा यांनी केला होता. मुख्यमंत्री शर्मांच्या या दाव्यावर महाराष्ट्रात चहुबाजूने टीका होत आहे. दुसरीकडे, भीमाशंकर देवस्थानचे अध्यक्ष अॅड सुरेश कौदरे यांनी शंकराचार्य यांच्या बारा ज्योतिर्लिंग श्लोक,शिवलिलामृत ग्रंथ,शिवपुराणाचे दाखला देत आसामच्या मुख्यमंत्र्यांचा दावा खोडून काढला आहे.
भीमाशंकर देवस्थानचे अध्यक्ष अँड सुरेश कौदरे यांनी शंकराचार्य यांच्या ग्रंथांचे दाखले देत आसामचे मुख्यमंत्री हिमंत विश्व शर्मा यांचा दावा खोडून काढला. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही हीच भूमिका असल्याचे ठाम मत कौदरे यांनी मांडली.
भीमाशंकरचे सहावे ज्योतिर्लिंग हे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात नसून आसाममध्ये असल्याचा दावा आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा शर्मा यांनी केला होता. त्याचबरोबर आसाम पर्यटन विभागाने यासंदर्भात जाहिरातबाजी देखील केली. बारा ज्योतिर्लिंगांपैकी सहावे ज्योतिर्लिंग म्हणून महाराष्ट्रातील खेड तालुक्यातील भीमाशंकर कडे पाहिले जाते. शेकडो वर्षाची परंपरा असलेले भीमाशंकर हे पुणे जिल्ह्यातले एकमेव ठिकाण असून या वादावर पुणे जिल्ह्यातील स्थानिक लोकप्रतिनिधींनी देखील नाराजी व्यक्त केली.
आसामच्या मुख्यमंत्र्यांनी भीमाशंकर मंदिर हे आसाममध्ये आहे, असा दावा केल्याने भाविकांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यामध्ये हस्तक्षेप करावा, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी केली. तर राज्यात बदला घेण्याचा कट आखण्यासाठी गुवाहाटीला जाऊन आसामच्या मुख्यमंत्र्यांचा पाहुणचार घेणारे या दाव्याचा कसा ‘बदला’ घेतात, याची महाराष्ट्र वाट पाहतोय असे खोचक ट्विट आमदार रोहित पवारांनी केले.