पुणे : पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो यांच्या निषेधार्थ दिल्लीपाठोपाठ आज मुंबई, पुणे, शिर्डी आणि कोल्हापूर, अमरावतीत भाजपकडून आंदोलन करण्यात आले. भुट्टो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गुजरातचा कसाई म्हटले. या विधानावर भाजपने आक्षेप घेतला आहे. भारतासमोर हतबल झाल्यामुळे पाकिस्तान भीतीपोटी अशी वक्तव्ये करीत आहेत,असे पुण्यातील मोर्चामध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. या विविध ठिकाणी झालेल्या आंदोलनांमध्ये पाकचे झेंडे जाळून निषेध व्यक्त करण्यात आला.
गुरुवारी न्यूयॉर्कमधील एका पत्रकार परिषदेत बिलावल म्हणाले की, ओसामा बिन लादेन मेला पण गुजरातचा कसाई अजून जिवंत आहे आणि सध्या तो भारताचा पंतप्रधान आहे. भारतात महात्मा गांधींच्या विचारांचे राज्यकर्ते नाहीत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तर हिटलरच्या प्रेरणेतून जन्माला आला आहे, अशी टीका त्यांनी केली. या पाकिस्तानच्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात शुक्रवारी दिल्लीतील पाक दूतावासासमोर भाजपकडून जोरदार आंदोलन करण्यात आले.त्यानंतर आज मुंबई पुण्यासह,शिर्डी, कोल्हापूर अमरावतीतही याचे पडसाद दिसून आले.पुण्यात अलका चौकात भाजपचे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात चंद्रशेखर बावनकुळे सहभागी झाले होते. यावेळी कार्यकर्त्यांनी पाकिस्तानचा झेंडा जाळला.यावेळी बावनकुळे म्हणाले की, आतंकवादी हल्ले हे पाककडूनच होत असतात हे संपूर्ण जगाला माहिती झाले आहे. 90 टक्के देशांचा मोदींना पाठिंबा आहे, त्यामुळे पाकिस्तान हा कर्जबाजारी झाला असून त्या देशाचे कोणी ऐकत नाही आहे.त्यामुळे पाकिस्तान भारतासमोर हतबल झाल्याने भीतीपोटी पाकिस्तान वेगवेगळी वक्त्तव्ये करुन भारताची प्रतिमा मलिन करीत आहेत,असे बावनकुळे म्हणाले.याशिवाय मुंबईतील माफी मांगो आंदोलनाच्यावेळी भाजप नेते प्रवीण दरेकर,पालकमंत्री मंगलप्रभात लोढा आणि आमदार प्रसाद लाड यांनी भुट्टो यांचा निषेध केला. त्यावेळी पाकिस्तानकडून झालेला पंतप्रधानांचा अपमान भारतातील नागरिक कदापि सहन करणार नाही,असे आमदार प्रसाद लाड म्हणाले.कोल्हापुरातही बिलावल यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.