कोल्हापूर-भुदरगड तालुक्यातील नागणवाडी येथे यात्रेनिमित्त बनवलेल्या प्रसादातून ८४ जणांना विषबाधा झाली आहे. आरोग्य विभागाने तातडीने गावातच उपचार केल्याने पुढील अनर्थ टळला.यापैकी दोघांवर गारगोटी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सौंदत्तीहून गावी परतलेल्या भक्तांनी मंगळवारी रात्री घरातून आंबील-घुगर्यांचा प्रसाद करून तो एकत्रित करून सर्वांना वाटला होता. रात्री हा प्रसाद घेतल्यानंतर पहाटेच्या सुमारास नागरिकांना उलट्या व जुलाब सुरू झाले. याची माहिती आरोग्य विभागास मिळताच पिंपळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ. चंद्रकांत परुळेकर, डॉ. महेंद्र लवटे यांनी नागणवाडी गावातील विठ्ठल मंदिर व ग्रामपंचायतीमध्ये उपचार सुरू केले. पोलिस निरीक्षक संजय मोरे, जिल्हा परिषद सदस्या रोहिणी आबिटकर, साथ रोग अधिकारी शुभांगी रेंदाळकर यांनी या ठिकाणी भेट दिली.उपचारानंतर रुग्णांना घरी पाठविण्यात आले असून गावात आरोग्य विभागाचे पथक तळ ठोकून आहे.दोन दिवस सर्वेक्षण करून रुग्णांची माहिती घेतली जाईल, असे आरोग्य अधिकारी चंद्रकांत परुळेकर यांनी सांगितले.