मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे उतरविण्याची आरोळी दिली आणि त्यांना मिळणारा पाठिंबा पाहून शिवसेनेचा धनुष्यबाण थरथरला, घड्याळाच्या हृदयाची टिकटीक वाढली आणि पंज्याला कंप फुटला. राज ठाकरे हे सामान्य माणसांच्या एकाही प्रश्नावर बोलत नाहीत. त्यांच्याकडे वक्तृत्त्व आहे, करिष्मा आहे, त्यांच्या सभेला हजारो माणसे स्वतःहून येतात अशी त्यांची ताकद आजही आहे. गेली दहा वर्षे कोणतेही विधायक कार्य न करता निवडणुकीच्या हंगामात उगवणार्या या छत्रीच्या मागे मराठी माणसे धावतात असे अजब वलय त्यांच्याभोवती आहे. दुर्दैवाने ही जनशक्ती आणि हे वक्तृत्त्व त्यांनी जनतेच्या समस्या कायमस्वरुपी सोडवण्यासाठी वापरल्या नाहीत. त्यांची आंदोलने निवडणुकीच्या आजूबाजूला सुरू होतात आणि सहा महिन्यांत संपतात. पण पुढच्या निवडणुकीत ते नवे वादळ उठवून जेव्हा ‘माझ्या तमाम हिंदू भगिनींनो, बांधवांनो आणि मातांनो’ असे त्यांच्या जादुई आवाजात म्हणतात तेव्हा मराठी माणूस भूतकाळ विसरून त्यांच्या मागे लागतो. परप्रांतीयांचा मुद्दा, मराठी तरुणांसाठी नोकर्यांकरिता स्वतंत्रपणे सुरू केलेले एम्लॉयमेंट एक्सचेंज, टोल आंदोलन, रेल्वे स्थानकांबाहेर फेरीवाल्यांना बंदी, मराठी पाट्या अशी त्यांची सर्व आंदोलने तुफान गाजली आणि काही काळात स्मृतीतून गेली. पूर्वीसारखेच सर्व सुरळीत चालू राहिले. तरीही कमाल म्हणजे राज ठाकरेंचा करिष्मा कमी झालेला नाही. त्यांच्या भाषणशैलीने भल्याभल्यांची मती गुंग होते हेच त्याचे एकमेव कारण आहे.
महागाई, वीज टंचाई, एसटी कामगार, गिरणी कामगार, शेतमालाला हमीभाव, शेतकर्यांना नुकसान भरपाई, कोकणातील अणुप्रकल्प, बँकांचे खाजगीकरण, नोकरी, बँकांचे थकीत हप्ते असे एकापेक्षा एक भयंकर प्रश्न महाराष्ट्रासमोर उभे आहेत. यातील एकही प्रश्न सोडविण्यासाठी राज ठाकरे यांनी आपला शब्द आणि आपली गर्दी खेचण्याची ताकद कधीही वापरली नाही. ते कायम सामान्यांच्या भावनेला हात घालण्याचा सोपा मार्ग निवडतात आणि लोकांच्या भावनेवर आरुढ होऊन डोळे दिपविणारे आणि बुद्धी बधिर करणारे वातावरण निर्माण करतात. आताही त्यांनी तेच केले आहे. त्यांच्या खांद्यावर भगवी शाल आली आणि महाराष्ट्रातील सूज्ञ हिंदुही वेडपिसे झाले. मशिदीवरील भोंग्यांचा आवाज कमी करणे हा सध्याच्या संकटाच्या काळात विषयच असू शकत नाही. पण राज ठाकरेंनी हा जीवन मरणाचा विषय बनविला आहे. माझे मनसैनिक किती केसेस अंगावर घेणार? असा सवाल चिडून विचारणारे राज ठाकरे आता मनसैनिकांना बिनधास्त कायदे मोडायला सांगत आहेत. निवडणूक लढवायला आमच्या पक्षाकडे पैसे नाहीत असे म्हणत निवडणुकीतून माघार घेणारे राज ठाकरे आता शंभर गाड्यांचा ताफा घेऊन जातात. सभांचे आयोजन करतात. दोन हजार वकिलांचा ताफा सज्ज ठेवतात.
पण महाराष्ट्राचे दुर्दैव असे की, राज ठाकरेंना उत्तर देईल असे नेतृत्त्वच महाराष्ट्रात उरलेले नाही. गिरणी कामगारांचा प्रश्न राज ठाकरेंनी सोडवला नाही, परंतु इतर पक्षांनीही सोडवला नाही, किंबहुना इतरांनी गिरण्या विकायला परवानगी दिली. एसटी कामगारांचा प्रश्न राज ठाकरेंनी घेतला नाही. परंतु सरकारनेही तो प्रश्न सोडवला नाही. भाजपाने तर या आंदोलनातून पळ काढला. महागाईबद्दल राज ठाकरे बोलत नाहीत. मात्र इतर पक्षही महागाई कमी करू शकले नाहीत. मागच्या साठ वर्षांत महागाई किती होती आणि आता किती आहे याचा केवळ आकड्यांचा खेळ कानावर पडतो. मनसेचे कार्यकर्ते मुंबईच्या खड्ड्यात बसून आंदोलन करीत होते, पण खड्डा तसाच राहिला आणि खड्ड्याच्या भ्रष्टाचारात तू आघाडीवर की मी आघाडीवर याचीच चर्चा रंगली, शेतकरी आंदोलन करीत होते तेव्हा इंजिन यार्डात होते, परंतु, काँग्रेसने किती कर्ज दिले आणि भाजपाने किती योजना आखल्या याचे फक्त आरोप प्रत्यारोप होत राहिले आणि शेतकरी फासावर लटकत राहिला. राज ठाकरे विषय घेत नाहीत आणि इतर पक्ष विषयातून मार्गच काढत नाहीत हे महाराष्ट्रातील चित्र आहे.
राज ठाकरेंना उत्तर देताना अजित पवार काय म्हणाले? अजित पवार म्हणाले की, आता कोणत्या निवडणुका आहेत का? मग कशासाठी लोकांच्या मनात संभ्रम अवस्था निर्माण करीत आहेत. (म्हणजे हे खेळ निवडणुकीच्या आसपास करायचे असतात असे अजित पवार सांगत आहेत) अजित पवार पुढे आणखी म्हणाले की, डिझेल, पेट्रोल, गॅस सिलिंडरच्या किमती वाढत आहेत. शेतकर्यांचा काही भागातील उस उचलायचा राहिला आहे. उन्हाची तीव्रता वाढली आहे. हे त्यांनी जे सुरू केले आहे त्यामुळे तुमच्या मुलांना नोकरी मिळणार नाही. तुम्हा आम्हाला रोजी रोटी मिळणार नाही. इथे वातावरण बिघडले तर कुणी गुंतवणूक करणार नाही. अजित पवार यांचे हे भाषण ऐकून लक्षात येते की, महाराष्ट्रात सेना, भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी यांची सरकारे वर्षानुवर्षे सत्तेवर असतानाही अद्याप इथे नोकरी, उद्योग, शेती, महागाई हेच प्रश्न आहेत. इतक्या वर्षांनंतरही तेच तेच प्रश्न उग्र रूप धारण करून आहेत. त्याच प्रश्नांची साधी तीव्रताही कमी झालेली नाही. मग राज ठाकरे हे प्रश्न उपस्थित करीत नाहीत हे म्हणताना इतरांनी या प्रश्नांवर काहीच उत्तर शोधलेले नाही हे स्पष्ट होते. त्यामुळेच राज ठाकरेंनी भोंगा प्रश्न आणल्यावर आम्ही विकास केला, नोकर्या निर्माण केल्या, उद्योग आणले, शेतकर्यांना सांभाळले असे उत्तर एकाही पक्षाचा नेता देऊ शकत नाही.
यामुळेच या नेत्यांनी आता भोंग्याला उत्तर काकड आरतीने देण्याचे ठरविले आहे. काकड आरती बंद होईल, सप्ताह बंद होतील असा बागुलबुवा तयार करणे इतकेच उत्तर या नेत्यांना सुचते आहे. सुप्रीम न्यायालयाच्या निर्णयाचे पालन केले तर काहीच बंद होत नाही. फक्त सकाळी लाऊडस्पीकरवरून त्याचे प्रक्षेपण बंद होणार आहे. पण राज ठाकरेंना उत्तर द्यायला विकास दाखवता येत नसल्याने इतर पक्षांनीही भावनेला हात घालण्याचा सोपा मार्ग निवडला आहे. आपले खरे प्रश्न कुणालाच महत्त्वाचे वाटत नाहीत, आपले प्रश्न सोडविण्याचा कुणीच प्रयत्न करीत नाही. भोंग्याच्या प्रश्नाने राज ठाकरे गाजले. आता काकड आरतीने इतर पक्ष बचावतील. तुम्ही आणि आम्ही आहोत तिथेच राहणार आहोत. कारण महाराष्ट्राला खुज्या नेत्यांची वाळवी लागली आहे.