नारायणगाव – मंचर – जुना चांडोली रोड परिसरात दहशत निर्माण करणारा दुसरा बिबट्या जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे.गेल्या १५ दिवसांपूर्वी याच ठिकाणी एक बिबटया पकडण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा पिंजरा लावला असता काल गुरुवारी पहाटे दुसरा बिबट्या पकडला गेल्याने स्थानिक नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
मंचर- जुना चांडोली रोड परिसरात बिबट्याचा वावर असल्याने नागरिकांच्या मागणीनुसार येथे पिंजरा लावण्यात आला होता. त्या पिंजऱ्यात एक बिबट्या जेरबंद झाला आहे. पंधरा दिवसांपूर्वी याच परिसरात एक बिबट्या जेरबंद करण्यात आला होता. त्यानंतरही या परिसरात बिबट्याचा वावर दिसत होता. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी या ठिकाणी अजून एक बिबट्या व बछडे असल्याचे वनविभागाला सांगितले होते.
त्यानंतर वनविभागाचे वनपाल संभाजीराव गायकवाड, वनरक्षक पूजा कांबळे व टीमने पंचलगेश्वर मंदिराशेजारी पिंजरा लावला होता. त्यात बिबट्या जेरबंद झाला आहे. दरम्यान बिबटे जेरबंद झाला असला तरी नागरिकांनी सतर्क राहावे, शेतात एकटे जाऊ नये, मुलांनी शाळेत एकत्र जावे, कोठे बिबट्या दिसून आल्यास तात्काळ वनविभागाला कळवावे, असे आवाहन वनपाल एस. एल. गायकवाड यांनी केले आहे.