नागपूर – मंत्रिमंडळाचा विस्तार लांबल्यामुळे भाजप आणि शिंदे गटाचे इच्छुक आमदार नाराज आहेत. पण मित्रपक्षही नाराज आहेत . आमदार बच्चू कडू यांनी तर आज मंत्रिमंडळाचा विस्तार आता पुढच्यावर्षी होईल .असे सांगून आतापर्यंत कोर्टाच्या तारखा पहिल्या होत्या पण आता मंत्रिमंडळ विस्ताराच्या तारखा बघाव्या लागत आहे अशा शब्दात सरकारला घरचा आहेर देत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत उपरोधिक भविष्यवाणी केली आहे.
प्रहार जनशक्ती संघटनेचे आमदार बच्चू कडू हे नागपुरात आले होते यावेळीबोलताना ते म्हणाले कि मी मागितलेले मंत्रालय मिळाले, त्यामुळे किमान माझी तरी सरकारवर काही नाराजी नाही. या सरकारने दिव्यांग मंत्रालय दिले, याचा मनस्वी आनंद आहे. माझ्या बंडखोरीचे यश म्हणजे दिव्यांग मंत्रालय आहे, ते पुढे म्हणाले कि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझ्या बंडखोरीचा चांगला विचार केला. माझ्या वाट्याला काय आलं, हे महत्वाचं नाही, तर माझ्या दिव्यांग बांधवांच्या वाट्याला मंत्रालय ही माझ्या आयुष्यातील मोठी गोष्ट आहे, असे ते म्हणाले. निवडणूक आयोग आणि न्यायालय यांचे ‘तारीख पे तारीख’ सुरू आहे. निकाल येत नाही, तोपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार होणार नाही, असं सध्यातरी दिसतंय आणि या निकालानंतरही विस्तार झाला नाही, तर मग तो २०२४च्या निवडणुकांनंतर होईल, असे बच्चू कडू यांनी सांगितले.