मुंबई: नैऋत्य बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या मंदोस चक्रीवादळामुळे राज्यातील काही भागात पावसाने हजेरी लावली आहे. सिंधुदुर्ग, इंदापूर आणि गडचिरोलीसह अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मदौस चक्रीवादळामुळे कुडाळ, सावंतवाडी आणि वेंगुर्ले तालुक्यातील बहुतांश भागात रिमझिम पाऊस झाला. या पावसामुळे आंबा, काजूला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. दरम्यान कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले. सिद्धनेर्ली, बामणी, शेंडूर, शंकरवाडी आदी गावांमध्ये पाऊस झाला होता. दरम्यान, रविवारी रात्री, करवीर, शाहूवाडी, गडहिंग्लज, आजरा तसेच भुदरगड तालुक्यातील काही गावांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली. काही भागात मोठा पाऊस झाला.
मंदोस वादळाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. काही भागांत विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता असल्याने प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. कोल्हापूरला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने ऊसतोड हंगामावर पुन्हा परिणाम झाला असून मजूरांच्या झोपड्यांच्या परिसरातही पाणी साचले आहे. दिलासादायक म्हणजे वातावरणात गारवा असल्याने तोडलेल्या ऊसाचे वजन कमी होत नाही.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार महाराष्ट्रातील मुंबईसह संपूर्ण कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील 14 जिल्ह्यात 12 डिसेंबरपासून ते 16 डिसेंबर दरम्यान ढगाळ वातावरण होण्याची शक्यता आहे. तर तुरळक ठिकाणी अवकाळी किरकोळ पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.