इम्फाळ – पक्षाने तिकीट नाकारल्याने भाजपाचे आमदार पी. सरतचंद्र यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्याबरोबर एन. बिरेन आणि एन. जॉयकुमार यांनीही काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेसने या तिघांचे पक्षात स्वागत केले आहे.
मणिपूरमध्ये भाजपा आणि ‘एनपीपी आघाडीचे सरकार आहे. मात्र या दोघांमध्ये निवडणूकपूर्व आघाडी झालेली नाही. राज्यातील सर्व ६० जागा लढविणार असल्याचे भाजपाने जाहीर केले आहे. राज्यात काँग्रेस हा प्रमुख विरोधी पक्ष आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाच्या तीन मोठ्या नेत्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने या पक्षाला बळ मिळाले आहे. तसेच भाजपातर्फे निवडणूक लढविण्याची इच्छा असताना पाच इच्छुकांनी आज नॅशनल पीपल्स पार्टीमध्ये प्रवेश केला. भाजपाने तिकीट नाकारलेल्यांना आम्ही संधी देऊ, मात्र त्यांच्यात निवडणूक जिंकण्याची क्षमता हवी, असे ‘एनपीपी’चे नेते आणि उपमुख्यमंत्री जॉयकुमार यांनी सांगितले. तसेच भाजपाने तिकीट नाकारल्याने आणि संधी मिळण्याची कोणतीही शक्यता नसल्याची खात्री झाल्याने सामाजिक कार्यकर्ते लॉरेम्बाम संजय यांच्यासह पाच जणांनी आज ‘एनपीपी’मध्ये प्रवेश केला. भाजपाने अनेक आमदारांना आणि इच्छुकांना उमेदवारी नाकारल्याने राज्यात मोठ्या प्रमाणावर नाराजीचे वातावरण आहे. नाराज नेत्यांच्या कार्यकर्त्यांनी भाजपाचे बॅनर आणि झेंडे जाळून टाकले.