नवी दिल्ली – युवा कुस्तीपटू सागर धनकर याच्या हत्येप्रकरणी सध्या तिहार तुरुंगात असलेला भारतीय ऑलिम्पिक पदकविजेता कुस्तीपटू सुशील कुमार याने टीव्हीची मागणी केली आहे. तुरुंगात मन लागत नाही, तसेच कुस्तीविश्वात घडणाऱ्या घडामोडी कळण्यासाठी टीव्ही हवा असल्याचे सुशील कुमारने आपल्या अर्जात नमूद केले आहे. त्याने आपल्या वकिलांमार्फत हा अर्ज तुरुंग प्रशासनाला दिला आहे.
सुशील कुमारच्या या अर्जावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. मात्र तुरुंग प्रशासनाकडे केलेली ही त्याची पहिलीच मागणी नाही. यापूर्वी त्याला अटकेनंतर मंडोली तुरुंगात पाठविण्यात आले होते, तिथे त्याने आपल्या कुस्तीचा उल्लेख करत हायप्रोटीन आहाराची सोय करावी अशी मागणी तुरुंग प्रशासनाकडे केली होती. यामध्ये प्रोटीन देणाऱ्या हेल्थ सप्लिमेंट्स, ओमेगा-३ कॅप्सुल्स, जॉइंटमेंट कॅप्सुल्स, प्रि-वर्कआऊट सी-४, मल्टिव्हिटॅमिन जीएनसी आणि एक्सरसाईज बँड यांचा समावेश होता. मात्र न्यायालयाने त्याची ही मागणी फेटाळून लावल्यानंतर आता त्याने नवीन मागणी केली आहे.
दरम्यान, सुशील कुमार हा तिहार तुरुंगातील दोन नंबरच्या बरॅकमध्ये =आहे. सुरक्षेसाठी त्याला अतिसुरक्षित तुरुंगात ठेवण्यात आले असून त्या कक्षात इतर कोणत्याही कैद्याला ठेवण्यात आलेले नाही.