मुंबई – राज्यात थंडीचा कडाका कमी होत असला तरी अवकाळी पावसाचे संकट कायम आहे. उद्या शनिवारी १९ फेब्रुवारी आणि रविवारी २ दिवस विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्याचा फटका रब्बी पिकांना बसणार असल्यामुळे बळीराजा पुन्हा हवालदिल झाला आहे.
महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचे संकट कायम आहे. त्यात उद्या शनिवारी आणि परवा रविवारी विदर्भ, मराठवाड्यात पावसाची शक्यता आहे. मराठवाड्याच्या परभणी, बीड, नांदेड आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता आहे. विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, वाशिम, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा आणि यवतमाळमध्येही पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. यापूर्वीही झालेला अवकाळी पावसाचा मोठा तडाखा शेतकऱ्यांना बसला होता. त्यानंतर आता पुन्हा पाऊस पडणार असल्याने रब्बी पिके वाया जाण्याची भीती बळीराजाला सतावत आहे.