मुंबई – मराठा समाजाला आरक्षण मिळावे आणि त्यांच्या मागण्या पूर्ण व्हाव्या या मागणीसाठी 26 फेब्रुवारीपासून उपोषणाला बसणार असल्याचे पत्र खासदार संभाजीराजेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लिहिले आहे. खा. संभाजीराजे छत्रपती यांनी दोन दिवसांपूर्वी या उपोषणाची घोषणा पत्रकार परिषदेत केली होती. आज पत्र लिहित त्यांनी मुख्यमंत्र्यांना याची कल्पना दिली आहे. आठ महिन्यांपूर्वी सरकारने दिलेले आश्वासन अपूर्ण असल्याची संभाजीराजेंनी या पत्रातून तक्रारही केली आहे. त्यामुळेच उपोषण करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
संभाजीराजे छत्रपतींनी यासंदर्भात ट्वीटही केले आहे. ट्वीटमध्ये त्यांनी लिहिले आहे की, 5 मे 2021 रोजी मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर मराठा समाजाचे शैक्षणिक आणि सामाजिक नुकसान टाळण्यासाठी राज्य शासनाकडे समाजाच्या वतीने आम्ही काही मागण्या केल्या होत्या. 17 जून 2021 रोजी आपल्या उपस्थितीत मुंबई येथे झालेल्या बैठकीत आपण या सर्व मागण्या मान्य केल्या होत्या. मात्र आज आठ महिने उलटले तरी या मागण्यांच्या अंमलबजावणीबाबत कोणतीही प्रशासकीय कार्यवाही झालेली दिसत नाही. आणखी एका ट्वीटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, यामुळे मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी या मागण्यांची ठोस अंमलबजावणी होईपर्यंत 26 फेब्रुवारीपासून आझाद मैदान, मुंबई येथे मी स्वतः आमरण उपोषणाला बसणार आहे. 2007 पासून मी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला आहे. मराठा समाज देखील वंचित घटक आहे. त्यासाठीच आरक्षणाची भूमिका घेतली. मी मराठा आहे म्हणून मराठा आरक्षणासाठी लढत आहे असे नाही. 5 मे 2021 ला आरक्षण रद्द झाले. मागील काही दिवसांत अनेकवेळा आंदोलने केली. परंतू अजूनही कोणतीच मागणी पूर्ण नाही. मी आत्तापर्यंत आक्रमक होतो परंतू आता मी उद्विग्न झालो असल्याचे वक्तव्य खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी केले. मराठा आरक्षणासाठी 26 फेब्रुवारीला मी स्वतः आमरण उपोषणाला मुंबईतील आझाद मैदानात बसणार असल्याचे संभाजीराजे यांनी यावेळी सांगितले.